"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 02:43 PM2024-11-08T14:43:25+5:302024-11-08T14:44:08+5:30
धुळ्यातल्या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हैं तो सेफ हैं अशी नवी घोषणा दिली आहे.
Maharashtra Assembly Election 2024 : गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेची जोरदार चर्चा सुरु आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आलेल्या योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगेची घोषणा दिली होती. आता धुळे येथे झालेल्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी घोषणा देत 'एक हैं तो सेफ हैं', असे म्हटले होते. बटेंगे तो कटेंगे या घोषणेची ही पुढची आवृत्ती असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
याआधी वाशिममध्ये निवडणूक प्रचारादरम्यान योगी आदित्यनाथ यांनी, हम एक हैं तो नेक हैं और एक हैं तो सेफ हैं, असं विधान केलं होतं. आपल्यात विभाजन व्हायला नको. जेंव्हा आपल्यात फूट पडली तेंव्हा आम्ही कापले गेलो आहोत, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले होते. धुळ्यातील सभेत पंतप्रधान मोदी यांनी, काँग्रेस एका जातीला दुसऱ्या जातीविरोधात उभे करण्याचा धोकादायक खेळ खेळत असल्याचे म्हटलं आहे.
"आदिवासींची ओळख, अनुसूचित जाती जमातींची एकता तोडण्याचे काम काँग्रेस करत आहे. आदिवासी जातींची एकजूटता काँग्रेसला सहन होत नाहीये. काँग्रेसचा अजेंडा आहे की, देशभरातील आदिवासी जाती एकमेकांविरुद्ध लढत रहाव्यात, त्यांची सामूहिक आदिवासी ताकद संपायला हवी. धर्माच्या नावावर असाच कट काँग्रेसने रचला होता तेव्हा देशाचे विभाजन झालं होतं. आता काँग्रेस अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी समाजाच्या जातींना एकमेकांविरुद्ध उभं करत आहे. भारताच्या विरुद्ध यापेक्षा मोठा कट कुठलाही असू शकत नाही. आदिवासी जेव्हा एकत्र राहतील तेव्हाच त्यांची ताकद वाढेल. वेगवेगळ्या जातींमध्ये विभागले गेल्यानंतर तुमची ताकद कमी होईल. त्यामुळेच मी म्हणत आहे एक हैं तो सेफ हैं. आपल्याला एकजूट राहून काँग्रेसचा धोकादायक खेळ हाणून पाडून विकासाच्या वाटेवर पुढे जात राहायचे आहे," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
"महाविकास आघाडी हे एक असे वाहन आहे ज्याला ना चाक आहे ना ब्रेक आणि तिथले प्रत्येकजण ड्रायव्हरच्या सीटवर बसण्यासाठी भांडत आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीमुळेच महाराष्ट्राचा जलद विकास होईल. आम्ही जनतेला देवाचे दुसरे रूप मानतो, पण काही लोक जनतेला लुटण्यासाठी राजकारण करत आहेत. जेव्हा मी महाराष्ट्राकडे काही मागितले तेव्हा राज्यातील जनतेने मला मनापासून आशीर्वाद दिले आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्राच्या विकासाचा जो वेग सुरू आहे तो थांबू दिला जाणार नाही, याची ग्वाही मी देतो. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकारच महाराष्ट्राला आवश्यक असलेले सुशासन देऊ शकते," असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.