- राजेंद्र शर्माधुळे जिल्ह्यातील पाच मतदारसंघात मेगा भरतीमुळे बरीच राजकीय उलथापालथ झाल्याचे साक्री, शिंदखेडा आणि शिरपूर मतदारसंघात झालेल्या बंडखोरीने स्पष्ट होते. त्यामुळे ही निवडणूक जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.धुळे शहर मतदारसंघात भाजपला रामराम ठोकून माजी आमदार अनिल गोटे काँग्रेस - राष्टÑवादी आघाडीच्या पाठिंब्यावर अपक्ष उभे आहे. तर त्यांचे कट्टर प्रतिद्वंदी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे राष्टÑवादीला सोडचिठ्ठी देत अपक्ष उभे आहेत. शिवसेनेतर्फे हिलाल माळी, मनसेतर्फे प्राची कुळकर्णी, एमआयएमतर्फे फारुक शहा मैदानात आहे. मतदारसंघातील ही लढत दोन्ही माजी आमदारांसाठी राजकीय अस्तित्वाची ठरणार आहे.धुळे ग्रामीण मतदारसंघात भाजप-काँग्रेसमध्ये सरळ लढत होत आहे. येथून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांचे चिरंजीव विद्यमान आमदार कुणाल पाटील उभे आहेत. त्यांच्याविरोधात माजी आमदार द. वा. पाटील यांच्या स्नुषा माजी प. स. सभापती ज्ञानज्योती मनोहर भदाणे मैदानात आहेत. या दोन प्रतिद्वंदी राजकीय परिवारामधील लढत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.शिरपूर मतदारसंघातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अमरिशभाई पटेल यांनी आमदार काशिराम पावरासह भाजपत प्रवेश केला. भाजपने काशिराम पावरा यांनाच उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज झालेले भाजपचे डॉ. जितेंद्र ठाकूर यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी केली. ही लढत चुरशीची ठरणार.साक्रीत काँग्रेसचे विद्यमान आमदार डी. एस. अहिरे व भाजपचे मोहन सूर्यवंशी आणि भाजपच्या बंडखोर उमेदवार मंजुळा गावीत यांच्यातील तिरंगी लढत लक्ष्यवेधी ठरणार आहे.शिंदखेडा मतदारसंघात पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याविरोधात राष्टÑवादीतर्फे संदीप बेडसे उभे आहेत. शिवसेनेचे बंडखोर शानाभाऊ कोळी अपक्ष तर मंत्रालयात आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील मनसेतर्फे उभे राहिल्याने ही लढत रंगतदार ठरेल.प्रचारातील चर्चेचे मुद्देजिल्ह्यातील रखडलेल्या सिंचनाच्या प्रकल्पांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आणि जिल्ह्यातील बेरोजगारीचा प्रश्न, औद्योगिक विकास हे मुद्दे प्रामुख्याने विरोधक प्रचारात उचलताना दिसत आहे.साक्रीतील अवसायनात निघालेला पांझरा -कान साखर कारखाना सुरू करण्याचा प्रश्न, आदिवासी भागातील पेसा गावांचा प्रश्न खूप चर्चेत आहे. त्यांचा प्रत्यय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेच्यावेळेस आला. मुख्यमंत्र्यांना यावेळी नागरिकांना जाहीरपणे आश्वासनही द्यावे लागेल.निवडणुकीत मेगा भरतीमुळे जिल्ह्यातील तीन मतदारसंघात भाजप - सेनेत बंडखोरी झाली आहे. या बंडखोरीवर आणि कोण - कोणाचा प्रचार करतो या विषयावरही नेतेमंडळी एकमेकाविरोधात बोलताना दिसत आहे.
Maharashtra Election 2019 : मातब्बरांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई; मेगा भरतीमुळे राजकीय उलथापालथ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 4:25 AM