आॅनलाइन लोकमतधुळे : भारतासह जगात प्रेम, बंधुता, सामाजिक सहकार, मुल्यनिष्ठा, उपासना आणि सर्वत्र शांतता निर्माण व्हावी, आतंकवाद नाहीसा व्हावा यासाठी आज सकाळी महायज्ञ करण्यात आला. यासाठी तब्बल २४०० जोडप्यांनी पूजा केली. दरम्यान रविवारी स्वामी नारायण मंदिरात मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. देवपूरात असलेल्या स्वामिनारायण मंदिराच्या परिसरात गुलाबी दगडापासून नवीन भव्य मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे. या मंदिरात मूर्ती प्राण प्रतिष्ठेनिमित्त ८ फेब्रुवारीपासून सोहळ्यास सुरूवात झालेली आहे.शुक्रवारी ४८ चित्ररथांनी सजविलेल्या चित्ररथांनी भगवान स्वामिनारायणांच्या मूर्तीची शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत हजारो भाविक सहभागी झाले होते. शनिवारी विश्वशांतीसाठी महायज्ञ करण्यात आला. यासाठी ३०० यज्ञकुंडी तयार करण्यात आली होती. एका यज्ञकुंडाच्या ठिकाणी आठ दाम्पत्य बसले होते. असे एकूण २४०० दाम्पत्यांनी यज्ञात सहभाग घेतला होता.सुरवातीला महंत स्वामी महाराज यांचे एका वाहनातून यज्ञस्थळी आगमन झाले. मुख्य यज्ञकुंडात महंत स्वामी महाराजांनी आहुती टाकल्यानंतर यज्ञ सोहळ्यास सुरूवात झाली. वेद मंत्रोच्चाराच्या जयघोषात यज्ञात आहुती टाकण्यात येत होती. तसेच भाविक भक्तांच्या जीवनात आणि विश्वातील समस्त मानवाला शांती मिळावी, ते सुखी रहावे अशी प्रार्थना करण्यात आली.सुमारे चार तास हा यज्ञ सोहळा सुरू होता. यावेळी महंत स्वामी महाराज यांनी आशिर्वाद देतांना म्हणाले, यज्ञ परंपरा भारताची प्राचीन, वैदीक परंपरा आहे.सर्व भौतिक आणि जैविक तत्वांच्या सहकाराची भावना यज्ञात अभिव्यक्त होत असते. भगवान स्वामीनारायणांची भावना सर्व जीवहितासाठी होती. यज्ञसोहळा सुरू असतांना शहरासह ग्रामीण भागातील हजारो भाविकांनी दर्शन घेतले होते. यावेळी साधुसंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. रविवारी मुख्य सोहळा होणारमंदिरात रविवारी सकाळी १० वाजेपासून वेद मंत्रोच्चाराच्या जयघोषात स्वामी नारायण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास सुरूवात होणार आहे. हा सोहळा सुमारे दोन तास सुरू राहिल. महंत स्वामी महाराज यांच्याहस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होइल. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान मंदिरात स्थापित करण्यात येत असलेली भगवान स्वामीनाायणांची मूर्ती पाच फुटाची असून, ती जयपूर येथून आणण्यात आलेली आहे. या ंमंदिरातमध्ये अक्षरब्रह्म गुणातीतानंद स्वामी, हरिकृष्ण महाराज, राधाकृष्ण, लक्ष्मीनारायण, घनश्याम महाराज, शिवपार्वती-गणेश, राम,सीता, हनुमान, विठ्ठल-रूख्मिणी आदी मूर्तींची स्थापना करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
धुळे येथे विश्वशांतीसाठी महायज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2019 6:35 PM
रविवारी स्वामीनारायण मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा
ठळक मुद्दे२४०० दाम्पत्यांनी बसले यज्ञाला चार तास सुरू होता सोहळारविवारी स्वामी नारायण महाराज मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा