विंचूर : धुळे तालुक्यातील विंचूर परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे भरपूर पावसाने जोमाने वाढणारे पीक आतून मात्र उदध्वस्त होत आहे.यंदाच्या हंगामात पावसाचे उशीरा आगमन झाले. तर जोरदार पाऊस होईल, असा अंदाज घेऊन बहुसंख्य शेतकऱ्यांनी मका पिकाची पेरणी केली आहे. आधीच्या उगवण काळात पिकांची स्थिती चांगली होती. मात्र जुलैच्या दुसºया आठवड्यानंतर संततधार पाऊस झाल्यामुळे मशागतीचे काम करणे अवघडच झाले. या काळात मक्याची भरदार वाढ झाली. सध्या पावसाने दिलासा देत विश्रांती घेतली असून सर्व शेतकरी उत्साहाने पिकांची निंदणी, कोळपणी व खत लावणे आदी मशागतीची कामे करत आहेत. मात्र लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने प्रत्येक शेत शिवारात मका पिकाची स्थिती दयनीय बनल्याचे दिसून येते. बहुतांश शेतात मका पिकाची पाहणी करण्यासाठी आत शिरल्यावर लक्षात येते की लष्करी अळीने मक्यावर आक्रमण केले असून भरदार हिरवे दिसणारे पीक मात्र आतून पोखरले जात आहे. औषधी फवारणी करूनही उपयोग होताना दिसत नाही. त्यामुळे या अळीने मका उत्पादकांची झोप उडवली आहे. गत दोन वर्षे सतत दुष्काळाशी सामना केल्याने यंदा शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या.