मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे तीव्र पाणीटंचाईने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. त्यात गावातील हातपंप नादुरुस्त असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत होती. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने वृत्त देऊन ग्रामस्थांची व्यथा मांडली होती. या वृत्ताची दखल घेत ग्रामपंचायतीने हातपंप दुरुस्तीचे काम हाती घेतले. यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईत काहीसा दिलासा मिळाला आहे.मालपूर येथे भीषण पाणी टंचाईचे संकट उभे राहिले आहे. यासाठी नवनिर्वाचित ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य युद्ध पातळीवर कामाला लागल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक सदस्य पहाटे जलकुंभाजवळ एकत्रित येऊन आपापल्या वॉर्डात पाणी कसे जाईल, याचे नियोजन करीत आहेत. गावातील भवानी नगर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक व श्री गोपाल दूध डेअरीजवळील हातपंप बºयाच वर्षांपासून नादुरुस्त होते. यासाठी वेळोवेळी दुरुस्तीची मागणी होत होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त देऊन नागरिकांची व्यथा मांडली. त्यानंतर ग्रामपंचायतीने नादुरुस्त हातपंपाची दुरुस्ती केली. तसेच वॉर्ड क्र.४ मध्ये नवीन बोअर देखील झाल्यामुळे पाणीटंचाईत काहीसा दिलासा मिळाला आहे.भवानी नगरातील हातपंपावर मोटार लावून तेथील हाळमध्ये पाणी टाकण्यात येत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचा वापराच्या पाण्याचा प्रश्न व गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीअंशी मार्गी लागला आहे. या बोअरचे पाणी गोड असल्याने ते पिण्यासाठी देखील चालू शकते, असे येथील नागरिकांनी सांगितले.
मालपूर : ग्रामपंचायतीकडून उपाययोजना, पाणीटंचाईत नागरिकांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 5:11 PM