धुळे : रात्रीच्या वेळेस एका वाहनात बसून साक्रीकडे येत असताना कुसुंबाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघात झाला. यात गंभीर दुखापत झाल्याने कांतीलाल सीताराम चौधरी (वय ५७, रा. रोहोड, ता. साक्री) यांच्यावर उपचार सुरू होते. अपघाताची ही घटना २५ जुलै रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास घडली होती. मुंबईत उपचार घेताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सोमवारी धुळे तालुका पोलिस ठाण्यात फरार ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला.
मयत कांतीलाल चौधरी यांचा मुलगा सुनील चौधरी यांनी तालुका पोलिस ठाण्यात सोमवारी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, धुळ्याहून एका वाहनात बसून धुळ्याहून साक्रीकडे येत हाेते. २५ जुलै २०२३ रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास वडील कांतीलाल चौधरी बसून प्रवास करत असलेल्या वाहनाला पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात वाहनाचे नुकसान झाले. शिवाय वडील कांतीलाल चौधरी यांना डाव्या कंबरेला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
तेथून त्यांना धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांची तब्येत अधिकच बिघडत असल्याने त्यांना ४ ऑगस्ट २०२३ रोजी मुंबई येथील केईएम हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची कागदपत्रे मुंबई येथून दाखल झाल्यानंतर याप्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरोधात सोमवारी दुपारी १२:०० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस नाईक एस. बी. देवरे घटनेचा तपास करीत आहेत.