पिंंपळनेर : पोळा म्हणजे शेतकºयांचा आवडता सण असतो. शेतकºयांची शेती कसण्याचे काम जो करतो तो म्हणजे बैल. त्यामुळे येथे बैलपोळा सण ऐतिहासिक परंपरेनुसार अपूर्व उत्साहात साजरा केला जातो. येथील पोळा फोडण्यासाठी गुलाल उधळून व वाजत-गाजत मराठा-पाटील समाज व सगरवंशीय जिरे पाटील समाजांची सामूहिक मानाची मिरवणूक निघते. ही परंपरा कित्येक वर्षांपासून कायम आहे. संपूर्ण पंचक्रोशीत येथील पोळा वैशिष्ट्यपूर्ण आहे. या ठिकाणी पोळा फोडण्याचा प्रथम मान हा मराठा-पाटील समाजाला आहे. या समाजाच्या सजविलेल्या बैलजोड्यांची मिरवणूक गावाच्या पश्चिमेला असलेल्या पानखेड दरवाजा येथून निघते. डफ, पिंगाणी वाजवत ही मिरवणूक अत्यंत थाटात काढण्यात येते. या मिरवणुकीत आकर्षकरीत्या सजविलेल्या बैलजोड्या पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी जमते. येथील गुरूदत्त मंदिरातील मारूतीरायाला प्रदक्षिणा घालून ही मिरवणूक बाजारपेठेत येऊन शिवाजी चौकात पोहचते. तेथे गुलालाची उधळण केली जाते. जुन्या ग्रामपंचायतीजवळ पोळा फोडला जातो. या मिरवणुकीनंतर सगरवंशीय जिरे पाटील समाजाच्या मिरवणुकीस श्री क्षेत्र मुरलीधर मंदीर संस्थान येथून प्रारंभ होतो. समाजाचे सर्व लोक सजविलेले बैल घेऊन या स्थळी जमा होतात. मंदिराला वळसा घालून एखंडे गल्लीतून वाजत गाजत ही मिरवणूक निघते. समाजबांधवांची मोठी गर्दी असते. या दोन्ही मिरवणुका सायंकाळी निघतात. त्या पाहण्यासाठी गावासह परिसरातून मोठ्या संख्येने ग्रामस्थ, तरूण या बैलपोळ्याचा आनंद लुटतात. दोन्ही मिरवणुका निघाल्यानंतर गावातील उर्वरीत शेतकरी वैयक्तिकरीत्या गावात सजविलेल्या बैलांची मिरवणूक काढतात. बैलांना मिरवतात. बैलांना फिरवून आणल्यानंतर दारापुढे बांधून घरातील सुवासिनी त्यांना ओवाळतात. पुरणपोळी, गहू खावू घालतात. नैवेद्य दाखविल्यानंतर घरातील मंडळी जेवणासाठी बसतात. वर्षभर बैलांसोबत राहणारा, त्यांची सेवा करणारा सालदारालाही या दिवशी मालकाच्या घरी जेवणाचे आमंत्रण असते. त्याचा आदरही केला जात असतो. अशा पद्धतीने या परिसरात येथील पोळा सणाचा अपूर्व उत्साह पहावयास मिळतो. पूर्वसंध्येलाच त्यासाठी होणाºया तयारीतच चुणूक दिसते.
पोळा फोडण्यासाठी मानाची मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 6:57 PM