अतुल जोशी, धुळे : मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळणार नाही असे काहींना वाटत होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले. हे आरक्षण न्यायालयातही टिकेल यासाठी भक्कम प्रयत्न करू अशी ग्वाही खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी आज येथे दिली.धुळे येथे झालेल्या सभेप्रसंगी ते बोलत होते.
डॉ. शिंदे म्हणाले, यापूर्वी मराठा समाजाला दोनवेळा आरक्षण देण्यात आले. मात्र ते न्यायालयात टिकू शकले नाही. त्यामुळे आताही दिलेले आरक्षण टिकेल की नाही अशी काहीजण साशंकता व्यक्त करीत आहे. मात्र न्यायालयातही हे आरक्षण टिकण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले. दरम्यान पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद दूर ठेवत पक्ष संघटनेसाठी कार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
धुळे बसस्थानकासाठी ४ कोटी मंजूर :
धुळे मध्यवर्ती बसस्थानकाची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. बसपोर्टचा प्रश्नही अनेक वर्षांपासून प्रलंबितच आहे. बसस्थानकात किमान मुलभूत सुविधा द्याव्यात अशी प्रवाशांसह शहरवासियांची मागणी होती. अखेर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी धुळे बसस्थानकासाठी चार कोटी रूपये देत असल्याचे सभेत जाहीर केले.