- आनंद इंगोलेराष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरी (वर्धा) : बेळगावसारख्या सीमावर्ती भागामध्ये मायमराठीला समृद्ध करण्यासाठी शासनाने उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे; परंतु साहित्य संमेलने आयोजित करणे ही सरकारची जबाबदारी नाही. स्वायत्त संस्थांच्या माध्यमातूनच संमेलनाचे आयोजन व्हावे, असे प्रतिपादन ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी करून सरकारची पाठही थोपटली अन् दणकाही दिला.
९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तत्पूर्वी, शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. ध्वजारोहण आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
शब्द नसते तर जीवन अंधकारमय असते : विश्वनाथप्रसाद तिवारीरामायण, महाभारताने पूर्ण देशाला एका सूत्रात बांधले. भाषा हा जीवनातील महत्त्वाचा आविष्कार आहे. मनुष्याला रूप परमेश्वराने दिले; पण नाव माणसाने दिले आहे. या माणसाला पशूपासून अलग करण्याचं काम भाषा करीत असते. या भाषेला शब्दांमुळे समृद्धता येते. जर शब्द नसते तर आपले जीवनच अंधकारमय झाले असते, असे मत हिंदी साहित्यिक विश्वनाथप्रसाद तिवारी यांनी व्यक्त केले.
तीर्थस्थळी येऊन स्वागत करण्याचं भाग्य लाभलं : उषा तांबेवर्धा हे स्वातंत्र्यसैनिकांचे तीर्थस्थळ असून या ठिकाणी आयोजित साहित्य संमेलनाच्या भूमीलाही ‘महात्मा गांधी साहित्यनगरी’ व ‘आचार्य विनोबा भावे सभा मंडप’ असे नामकरण करण्यात आले. या तीर्थस्थळावर येऊन सर्व मान्यवरांचे स्वागत करण्याचा मान मिळाला, हे भाग्यच आहे, असे मत अखिल भारतीय मराठी महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांनी व्यक्त केले.
ज्योती विझू विझू जाई...साहित्य संमेलनाचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते रोपट्याला पाणी देऊन व दीपप्रज्वलन करून झाले. पंखा सुरू असल्याने दीप काही पेटेना! अखेर मुख्यमंत्र्यांनी दोन्ही हात लावले आणि स्वागताध्यक्षांनी दीपप्रज्वलित केले. त्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी दोन्ही हात लावले आणि मुख्यमंत्र्यांनी दीप पेटविले. यावेळी ‘ज्योती विझू विझू जाई...’ असे शब्द बाहेर पडले.
तळमळीतून होते साहित्याची निर्मिती : मुख्यमंत्री शिंदेवर्धा : सामाजिक तळमळीतून साहित्याची निर्मिती होते. साहित्यातून समाजाला जगण्याचे बळ मिळते. त्यामुळे अशा साहित्य संमेलनाची आवश्यकता असून, येथील आयोजन हे सुदृढ सांस्कृतिक लोकशाहीचे विराट रूप आहे, असेही प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सेवाग्राम येथील चरखागृहात बापू आणि विनोबा यांचे शिल्प उभारण्यात आले आहे. तेथे ‘लाइट ॲण्ड फाउंटेन शो’करिता निधी उपलब्ध करून देत लवकरच निर्मिती करणार, अशी घोषणाही त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान निदर्शकांची घोषणाबाजीमुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू होताच ‘पन्नास खोके, एकदम ओके... आणि विदर्भातील ५० हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण’, असा सवाल करत काहींनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे संमेलनस्थळी एकच गोंधळ उडाला. घोषणाबाजी करणाऱ्यांना आवरण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. अचानक उडालेला गोंधळ बघून मंचावरील मान्यवर मंडळीदेखील अवाक् झाली. यावेळी विदर्भवाद्यांनीदेखील यात उडी घेऊन सभामंडप दणाणून सोडला.