ऑनलाईन लोकमत
धुळे,दि.8- शहरासह जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाचे जोरदार आगमन झाल्याने पांझरा नदीला पूर आला. पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील पुलाच्या कामासाठी तयार करण्यात आलेले दोन तात्पुरते रस्ते वाहून गेल्याने वाहतुक विस्कळीत झाली होती तर शहरातही ठिकठिकाणी पाण्याचे तळे साचले होत़े
सायंकाळी जोरदार सरी
शहरात सायंकाळी सव्वा पाच वाजता पावसाला सुरूवात झाली़ सुमारे तासभर सुरू असलेल्या पहिल्या पावसात लहान मुलांसह नागरिकांनीही भिजण्याचा आनंद घेतला़ त्यामुळे शहरातील नाल्यांना देखील पूर आला होता़ तर ठिकठिकाणी गुडघाभर पाणी साचले होत़े पावसामुळे अनेक भागात वीजपुरवठा खंडीत झाला होता़
जिल्ह्यातही दमदार पाऊस
जिल्ह्यात देखील मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली़ धुळे ते नेर्पयत सर्व भागात पाऊस झाला़ तर नरडाणा, बेटावद परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली़ या पावसामुळे लहान-मोठय़ा नाल्यांना पूर आला होता़ रात्री उशिरार्पयत रिमङिाम पाऊस सुरूच होता़
तात्पुरते रस्ते वाहून गेले
नागपूर-सुरत या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आह़े या कामात इच्छापूर्ती गणपती मंदिराजवळ व आनंदखेडा पुलाच्या कामासाठी तयार करण्यात आलेले तात्पुरते रस्ते वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती़ पर्यायी रस्त्यालगत असलेल्या महामार्गावरून देखील पाणी वाहत होत़े त्यामुळे महामार्गावरील वाहतूक मेहरगावमार्गे वळविण्यात आली़ महामार्गावरील वाहून गेलेले तात्पुरता रस्ते सायंकाळर्पयत दुरुस्त करण्यात येतील. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत होईल, असा दावा महामार्ग प्राधिकरण कार्यालयातर्फे करण्यात आला आहे.
तीन झाडे कोसळली
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा, बेटावद परिसरातही दमदार पाऊस झाला़ त्यामुळे नरडाणा-अमळनेर रस्त्यावर तीन ठिकाणी झाडे कोसळल्याने वाहतुक ठप्प झाली होती़ याठिकाणी अमळनेर, शिंदखेडा, नंदूरबार व शिरपूर डेपोच्या बसेस अडकल्याने बसमधील प्रवाशी रस्त्यावर बसून होत़े
पांझरा नदीचे पाणी ओसरले
अक्कलपाडा प्रकल्पातून पांझरा नदीपात्रात पाण्याचे तिसरे आवर्तन सोडण्यात आले आह़े त्यातच बुधवारी सायंकाळी नेर, कुसूंबा व आजुबाजूच्या डोंगराळ परिसरात मुसळधार पाऊस झाल्यामुळे पांझरा नदीला पूर आला़ शहरात पांझरा नदीपात्रावर उभारण्यात आलेल्या तळफरशीवरून पाणी वाहत होत़े नदीचे संपूर्ण पात्र पाण्याने भरून वाहत असल्याने पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती़ दोन्ही बाजूने फरशीपूल बंद करण्यात आला़ रात्रीतून पाऊस थांबल्याने आता नदीचे पाणी ओसरले आहे.