लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : येथील किसान विद्या प्रसारक संस्था संचालित डॉ.विजयराव व्ही. रंधे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये भारतीय गणित विश्वातला तेजस्वी तारा श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिन व राष्ट्रीय गणित दिनानिमित्त गणित साहित्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.हर्षाली रंधे यांच्याहस्ते श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मेळाव्याचे उद्घाटन डॉ.सुमिता गवळी यांच्याहस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान विद्या प्रसारक संस्थेच्या खजिनदार आशा रंधे होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, गणित हा विषय अनेकांना अवघड जातो. या विषयाविषयी ममत्व वाटण्याऐवजी भीतीच अनेक मुलांच्या मनात असते. अशा गणित साहित्य प्रदर्शनामुळे मनातील गणितीय भीती दूर होण्यास मदत होते. मेळाव्यात सुमारे ५६ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सहभागी विद्यार्थ्यांना गणित शिक्षक वंदना पांडे, निकिता राजपूत, महेश राजपूत यांनी मार्गदर्शन केले. गणितीय स्पर्धेत प्रथम क्रमांक- भावेश शिंपी (गणितीय युक्त्या), द्वितीय- हर्षाली नितीन पाटील, अंशु विश्वकर्मा (भागाकार पद्धत), तर तृतीय क्रमांक लिकांक्षा पवार (गुणकाराची लॅटिक पद्धत) यांनी मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्याहस्ते गौरव करण्यात आला. स्पर्धेत परीक्षक म्हणून सुरेखा चौधरी, आस्विनी भामरे यांनी काम पाहिले. याप्रसंगी प्राचार्या कामिनी पाटील, सारिका ततार, मनीषा पाटील, शगुफ्ता पिंजारी, रिदवना शेख, भूषण पाटील, नेहा गिरासे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश राजपूत यांनी केले. आभार प्रदर्शन शितल चव्हाण यांनी केले.
रंधे विद्यालयात गणित साहित्य मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 11:18 AM