शिरपूर : तालुक्यातील अर्थे बु. येथे म्हाळसादेवी तर उंटावद येथे सुलाई माता यात्रोत्सवाला जल्लोषात प्रारंभ झाला. येथे दिवसभर दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी भाविकांची रिघ लागली होती. या यात्रेत लाखोंची उलाढाल झाली.अर्थे- येथील म्हाळसादेवीच्या यात्रोत्सवाला चैत्र शुद्ध चर्तुदशीला सुरुवात झाली. येथे नवस फेडण्यासाठी व लहान बालकांचे जाऊळ काढण्यासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला होता. पंचक्रोशीतील भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. खानदेशातील भाविक मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी येथे येतात. या पार्श्वभूमीवर ट्रस्टमार्फत जय्यत तयारी करण्यात आली आहे. विश्वस्त मंडळाने मंदीर परिसरात भाविकांसाठी अनेक सोयीसुविधा देणगीतून उपलब्ध करुन दिल्या आहेत. यात्रोत्सवाच्या पाशर््वभूमीवर मंदिराची सजावट करण्यात आली आहे. यात्रा परिसरात विविध खाद्यपदार्थ विक्रेते, रसवंती, पूजेचे साहित्य, खेळणी, मनोरंजनासाठी पाळणे, संसारोपयोगी साहित्याची दुकाने व्यावसायिकांनी थाटली आहेत. भाविकांच्या गर्दीमुळे या व्यावसायिकांना चांगला प्रतिसाद मिळाला.उंटावद- अरुणावती नदीच्या काठी असलेल्या उंटावद येथील उत्तर महाराष्टÑातील एकमेव असलेल्या सुलाई माता मंदिरात यात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. भाविकांनी दर्शनासाठी, मानमानता फेडण्यासाठी व लहान बालकांचे जाऊळ काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परिसरात पुजेचे साहित्य, संसारोपयोगी साहित्य, मनोरंजनासाठी पाळणे, विविध ज्वेलरी, कटलरी यासह खाद्यपदार्थ, रसवंती, शीतपेय व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. १८ रोजी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दोन दिवस ही यात्रा चालते. येथे भाविकांची राहण्याची, पाण्याची सुविधा करण्यात आली आहे. शिरपूर- वरवाडे भागातील म्हाळसादेवी मंदिरातही चैत्रोत्सव साजरा केला जात आहे. महाआरती, पूजा पठण आदी कार्यक्रम झाले. मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
अर्थे, उंटावद यात्रेत लाखोंची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:07 PM