धुळे : अपघातग्रस्ताला रूग्णालयात नेण्यासाठी १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका दिली नाही म्हणून दहिवेल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यास धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी साक्री तालुक्यातील डुकरीपाडा येथील सरपंच, पोलीस पाटीलसह २० ते २५ जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.डकुरीपाडा येथील सतिश रामदास गायकवाड (१८) या तरूणाचा अपघात झाला होता. त्यासाठी १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका का दिली नाही असे सांगत सरपंच, पोलीस पाटील यांच्यासह २० ते २५ जणांनी दहीवेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सुरेश लोटन गवळे (५६,रा. दहिवेल) यांच्याशी वाद घालून त्यांच्या अंगावर धावले. धक्काबुक्की करण्यात आली. तसेच मयताचे शवविच्छेदन करण्यापूर्वी वैद्यकीय अधिकाºयाकडे दीड लाखाची मागणीही केली. तसा लेखी कागद तयार करून त्यावर सही घेण्यात आली. नातेवाईकांनी कर्मचाऱ्यांनाही शिवीगाळ केली. हा सर्व प्रकार ३१ मार्च रोजी सायंकाळी ४.५० वाजेच्या सुमारास झाला. या प्रकरणी गवळे यांच्या फिर्यादनुसार सरपंच बन्सीलाल जगताप, पोलीस पाटील शांताराम गायकवाड, रतिलाल गवळी, छोटूसिंग मोघे, गोरख गायकवाड, रामदास गायकवाड यांच्यासह आप्त व अन्य २० ते २५ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला.
वैद्यकीय अधिकाऱ्यास केली धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 10:22 PM