शिरपूर : आदिवासी बांधवांसाठी पर्वणी असलेल्या भोंगऱ्या बाजाराचा तालुक्यातील कोडीद व दहिवद येथे जल्लोषात समारोप झाला. लोकगीत गायन, बासरीच्या सुरात व ढोलच्या तालात आदिवासींनी कलाविष्कार सादर करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या बाजारात लाखो रूपयांची उलाढाल झाली.बुधवारी कोडीदसह दहिवद, पनाखेड, मध्यप्रदेशातील राजपूर, धोंदरा, धवळी, सिलावद, बालसमुद्र येथे गावाचा आठवडा बाजार होता. यानिमित्ताने गावात भोंगºया बाजार भरला. उत्सवप्रिय आदिवासी युवक-युवतींसाठी हा बाजार म्हणजे आनंदाची पर्वणीच असतो. भोंगºया बाजारातून आदिवासी संस्कृतीचे आगळेवेगळे दर्शन घडले. यंदा परिसरातील हजारो आदिवासी बांधवांनी हजेरी लावली होती.भोंगºया बाजारात दुकाने थाटण्यासाठी व्यावसायिकांना रस्त्याच्या दुतर्फा तात्पुरती जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. विविध विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. सकाळी ११ वाजेपासूनच मालकातर, धाबापाडा, झेंडेअंजन तसेच परिसरातील गावांमधील आदिवासी युवक-युवती विविध वेशभूषा करून सहभागी झाले होते. आदिवासी बांधवांनी सजविलेल्या बैलगाडीतून तर काही मिळेल त्या वाहनातून बाजाराला आले होते. गावाजवळच्या पाड्यातून येणाºया आदिवासी बांधवांनी मोठ्या आकाराचा ढोल, तीरकामठा, कास्याची गिरमी, बासरी आदी साहित्य सोबत आणले होते. दुपारनंतर बाजारात मोठी गर्दी उसळली होती. तरूण-तरूणींनी खास आदिवासी पोषाख, काहींनी कमरेभोवती आकर्षक शाली गुंडाळल्या होत्या. डोंगरदऱ्यांमध्ये राहणाºया आदिवासींच्या डोक्यावर असलेल्या टोप्यांवर निरनिराळे प्राणी-पक्षांची चित्रे होती. पारंपारिक आदिवासी गितांसह काही हिंंदी चित्रपटांच्या गितांचे सुरही बासरीतून वाजवित होते. अनेक आदिवासी बांधवांनी गटा-गटाने नृत्य करून आनंद लुटला.आदिवासी भागातील इतर भागापेक्षा कोडीद येथील बाजार मोठ्या स्वरूपात भरला होता. या बाजारात आदिवासी वर्षाला लागणारे सांसारीक वस्तु खरेदी करतात. होळी सणांसाठी लागणारे सामान व साहित्यांची खरेदी आदिवासी बांधवाकडून मोठ्या प्रमाणावर करण्यात आली. पारंपारिक पध्दतीचे कपडे व दाग-दागिने, लहान मुला-मुलींसाठी व स्वत:साठी कपडे आदी सामानांची व वस्तुंचे दुकाने विक्रीसाठी सज्ज होती. सुमारे १८ ते २० लाखांची उलाढाल येथील बाजारात झाली. आदिवासी महिला हा धार्मिक सण मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा करतात. ढोलच्या तालावर नाच-गाण्याचा आनंद लहान-मोठे-थोर महिला-पुरूष घेत होते.
भोंगऱ्या बाजारात गुंजले लोकगीतांचे सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 10:11 PM