धुळे : जिल्ह्यातील महिलांपेक्षा पुरुष अधिक तणावग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षणातून अशी माहिती मिळाली आहे.राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षणाद्वारे जिल्ह्यातील उच्च रक्तदाबाच्या रुग्णांचे प्रमाण वाढले असल्याचे समोर आले आहे. तसेच मधुमेहाच्या रुग्णांमध्येही मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट व ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षण राबवण्यात आले. त्यानुसार एकूण १८ हजार ५४० उच्च रक्तदाबाचे रुग्ण आढळले आहेत. त्यात पुरुषांची संख्या अधिक आहे. ११ हजार ६३० पुरुष व ६ हजार ९१० महिला रुग्ण आढळले आहेत. बदललेल्या जीवनशैलीमुळे तसेच धावपळीमुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होतो. तसेच मधुमेहाच्या बहुतेक रुग्णांमध्ये उच्च रक्तदाबाची व्याधी दिसते. पुरुषांमध्ये अवेळी जेवण, व्यसन यामुळे तणावग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे.काय काळजी घ्यावी?उच्च रक्तदाब होऊ नये यासाठी वजन नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. जास्त वजन असल्यामुळे उच्च रक्तदाबा सोबतच इतरही व्याधी जडू शकतात. नियमित व्यायाम करायला हवा. आहारात मिठाचे प्रमाण कमी असावे. तसेच पापड व लोणचे खाऊ नये. चाळीशी नंतर वेळोवेळी तपासणी करावी असे डॉ.निर्मलकुमार रवंदळे यांनी सांगितले.
धुळ्यातील पुरुषांना महिलांपेक्षा जास्त टेंशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 12:36 PM