दोंडाईचा (धुळे) : येथून जवळच असलेल्या रामी गावातील एका शेतात ट्रॅक्टरने नांगरणी व बैलजोडीने वखरणी करीत असताना जमिनीत धातूचे, चार मुखी, ११ इंच उंचीचे पुरातन जैन मंदिर आढळून आले. महसूल विभागाने याचा पंचनामा करून ते मंदिर पोलिसांकडे हस्तांतरित केले. याची माहिती नाशिकच्या पुरातन विभागालाही देण्यात आली. रामी गावालगत गंगाबाई रामभाऊ माळी यांची शेतजमीन आहे. शुक्रवारी त्यांचा भाचा दिगंबर गंगाराम माळी यांनी ट्रॅक्टरने नांगरणी व बैलजोडीने वखरणी केली. यावेळी त्यांना शेतजमिनीत धातूचे चारमुखी, ११ इंचचे छोटेसे जैन मंदिर आढळले. त्याचे वजन ४ किलो २५० ग्रॅम एवढे आहे. माळी यांनी ते जैन मंदिर गावातील महादेव मंदिराजवळ वडाच्या झाडाजवळ ठेवून दिले. शनिवारी तेथील पुजाऱ्यास जैन मंदिर दिसल्यानंतर त्यांनी पोलीस पाटील श्रीकांत वाघ यांना याची माहिती दिली. रविवारी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी महेशकुमार शास्त्री, पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, पोलीस पाटील श्रीकांत वाघ यांनी महादेव मंदिर व शेतजमिनीत जाऊन चौकशी करून पंचनामा केला.
मंदिरावर ५२ मूर्तींचे कोरीव कामजैन मंदिराबाबत जाणकार डुंगरचंद जैन यांचाही जबाब घेतला आहे. या मंदिरावर जैन भगवंताच्या चार मोठ्या व लहान-लहान ४८ अशा एकूण ५२ मूर्तींचे कोरीव काम केलेले आहे. शेतजमिनीत सापडलेले हे मंदिर दोंडाईचा पोलिसात जमा केले असल्याची माहिती मंडळ अधिकारी महेशकुमार शास्त्री यांनी दिली.