धुळे / शिरपूर :अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शिरपूर बाजारपेठेत आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे़ सध्या दरातही चांगलीच घसरण झाल्याने ग्राहकांमधून आंब्यांच्या मागणीत वाढ झाली आहे़ हापूस ५०० रुपये डझनावरून ३५० रुपयांवर आले असून केशर १००-१२० तर बदाम ८०-१०० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे़ तसेच सराफ बाजारातही साडे तीन मुहूर्तावर नागरिकांनी सोने - चांदीच्या दागिन्यांची खरेदी केल्याने बाजारात एका दिवसात लाखोंची आर्थिक उलाढाल झाली आहे.
धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून आंबा विक्रीस दाखल झाला आहे़ आंध्रप्रदेश व गुजराथ राज्यातून जिल्ह्यात आंब्याची आवक होत आहे. शिरपूरला सुरुवातीला आंब्याच्या पेटीचा दर दीड ते दोन हजाराच्या घरात होता़ एका पेटीत चार डझन आंबे असतात. आंबा बाजारात २०० ते २५० रुपये किलोप्रमाणे विकला जात होता. हे दर सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असल्याने ग्राहकांनी आंबे खरेदीकडे पाठ फिरविली होती़मात्र अक्षय तृतीयेच्या आदल्यादिवशी सोमवारी आठवडे बाजारात तब्बल ४० ते ४५ टन आंब्याची आवक झाली. बोहरून आलेल्या आंब्यांमध्ये केशर, बदाम, लंगडा, दशेरी हे प्रकार होते. सरासरी ७० ते १२० रुपये प्रति किलो आंबा विकला गेला. दर उतरल्याने बाजारपेठेत आंबे खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती.
सोनेखरेदीसह वाहन विक्री अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने-चांदीची खरेदीची मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली़ लग्नसराई व अक्षय तृतीयेचे औचीत्य साधत सोन्याची खरेदी करण्यात आली मात्र दुसरीकडे मुहूर्तावर दुचाकी वाहनांच्या खरेदीसाठी बुकिंगचे प्रमाण गेल्यावेळेप्रमाणेच आहे. काही अंशी त्यात वाढ झाली आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गेल्या आठ दिवसापासून नागरिकांनी आपले वाहन बुकींग केले होते़ मंगळवारी मुहूर्त साधत वाहन घरी नेले होते़ साधारणपणे तीनेश ते चारशे वाहनांची विक्री झाल्याची माहिती वाहन विक्रेत्याकडून देण्यात आली होती़
इलेक्ट्रॉनिक वस्तू्ंना पसंतीसोने बाजारात साधारणपणे दोन कोटी रुपयापर्यंत आर्थिक उलाढाल झाल्याचे जाणकारांचे मत आहे. याशिवाय कापड, इलेक्ट्रॉॅनिक वस्तूंचीही या मुहूर्तावर खरेदी झाली. इलेक्ट्रॉनिक वस्तू्ंमध्ये एलईडी टीव्ही, वॉशिग मशीन, एअर कंडीशनर, फ्रीज या वस्तूंची खरेदी करण्यात आली. याप्रकारे एकूण बाजारपेठेत अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर साधारणपणे दहा कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे़
घागर विक्रीही मोठ्याप्रमाणावरअक्षय तृतीयेनिमित्त प्रत्येक घागर भरण्याची प्रथा आहे. त्यानुसार शहरातील साक्री रोड, जुना आग्रारोड, दत्त मंदिर परिसर, नेहरू नगर पाण्याची टाकीजवळ व अग्रवाल नगर परिसरातील विक्रेत्यांनी घागर विक्रीसाठी ठेवल्या होत्या. ५० ते ७० रुपये याप्रमाणे घागर विक्री झाली.
आंब्यांच्या दरात वाढअक्षय तृतीयेच्या दिवशी पुरणपोळी व आंब्याचा रसाचा नैवेद्य हा दाखविण्यात येत असल्याने मंगळवारी पाचकंदील, जुना आग्रारोड, नेहरू चौक व दत्त मंदिर परिसरातील आंबे विक्रेत्यांकडे आंबे खरेदीसाठी गर्दी झाली होती. केसर, बदाम या प्रकारातील आंब्याला नागरिकांकडून विशेष मागणी होती. १२० ते १४० रुपये किलो या दराने आंब्याची विक्री केली जात होती. आंब्याच्या दरात तेजी असतानाही नागरिकांनी खरेदीला प्राधान्य दिल्याचे चित्र मंगळवारी बाजारपेठेत दिसून आले. अनेकांनी या सणाचे औचित्य साधून दुचाकी व चार चाकी गाड्यांची नोंदणी करून ठेवली होती.
लग्नसराई वगळता गेली कित्येक महिने सुवर्णपेढीत सोने खरेदीसाठी ग्राहकांचा कल कमी झाला आहे़ परंतु खरेदी दरात काही प्रमाणात घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे़ गेल्या महिन्यात सोने प्रति तोळा ३२ हजार ५०० रुपयांवर गेला होता़ या दरात थोडी घसरण झाली असून सध्या बाजारपेठेत सोन्याचा एक तोळ्याचा दर ३० हजार रुपये इतका आहे़ चांदीची घसरण झाली़ अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने व चांदीचे दर स्थिर असल्याने सुवर्णपेढीत सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी हळूहळू वाढत चालली आहे़