धुळे : साक्री तालुक्यातील एका गावातील प्रेमीयुगुलाने एका वेळेस गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जांभोरे गावातील जंगलात रविवारी घडली. सायंकाळी उशिरा हा प्रकार उजेडात आला. एकाच झाडाला दोघे जण लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नाही. दरम्यान, ही आत्महत्या आहे की घातपात याबाबत निजामपूर पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे.
साक्री तालुक्यातील एका वसतिगृहात राहणारी अल्पवयीन मुलगी ही वसतिगृहात नसल्याची माहिती मुलीच्या वडिलांना कळविण्यात आलेली होती. घरी आली आहे का? अशी विचारणा केली असता त्यास मुलीच्या वडिलांनी नकार दर्शविला. त्यानुसार, लागलीच परिसरात आणि नातेवाइकांकडे शोध सुरू करूनही त्याचा काही उपयेाग झाला नाही. तपास सुरू असतानाच साक्री तालुक्यातील जांभोरे गावाच्या जंगलात एका झाडाला मुलगा आणि मुलगी हे दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच मुलीच्या पालकांनी जंगलात धाव घेतली. गळफास घेतलेल्या अवस्थेत दोघेही आढळून आले. त्यांना तातडीने साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉ. गिरे यांनी तपासून सायंकाळी साडेसहा वाजता मयत घोषित केले. याप्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
दरम्यान, ही आत्महत्या आहे की कोणी घातपात केलेला आहे, याबाबत साशंकता आहे. मयत झालेले दोघेही एकाच गावातील असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. पोलिसांनी अधिक तपासाला सुरुवात केलेली आहे.