धुळे : महाराष्ट्र शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून अवैधरित्या गौण खनिज वाहतूक ग्रामस्थांनी रोखत ४ वाहन पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. याप्रकरणाने पुन्हा एकदा गौण खनिज तस्करांची हिम्मत वाढल्याचे बोलले जात असून यात प्रशासनातीलच काही अधिकारी, कर्मचारी सहभागी तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे. धुळे तालुक्यातील अजंग शिवारात असलेल्या पाझर तलावातून रात्रीच्या सुमारास अवैधरीत्या गौण खनिज वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच अजंग गावातील जागरूक ग्रामस्थांना मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ धुळे तालुका पोलिसांना यासंदर्भात माहिती देत घटनास्थळी पाचारण केले. यावेळी ग्रामस्थांनी गौण खनिज तस्करांना बोलण्यात लाऊन ४ वाहन थांबवून ठेवल्याचे पोलिसांना दिसून आले. धुळे तालुका पोलिसांनी वाहनचालकांना विचारणा केली असता त्यांच्याकडे शासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी नसल्याचे दिसून आले.
यावेळी घटनास्थळी सदर वाहनाची कसून तपासणी केली असता त्यात लाखो रुपयांचे गौण खनिज आढळून आले. पोलिसांनी तत्काळ पंचनामा करत पोलीस सुरक्षेत चारही वाहनांना शहरातील प्रांत कार्यालयात जमा करण्यात आले असून सदर वाहनासह गौण खनिज तस्करांवर शासनाच्या रॉयल्टी व दंडा यासह कार्यवाही करण्यात यावी. तसेच गावात दोन वर्षापासून नॅशनल हायवे क्रमांक ६ व पेट्रोल पंपाच्या भरावासाठी बेकायदेशीररित्या कुठलीही रॉयल्टी न भरता अवैध गौन खनिजाची रात्रीची चोरटी वाहतूक प्रांत, तहसीलदार, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच यांच्या संगनमताने होत असून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार या गौण खनिजातून होत असल्याचा आरोप डॉ दिनेश माळी, किशोर अहिरे, चेतन गायकवाड, प्रदीप माळी, उमेश माळी, योगेश माळी यांनी केला आहे.
येणाऱ्या काळात प्रशासनाने गौण खनिज माफियांविरोधत कडक कार्यवाही न केल्यास मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांना भेटून पुराव्यासह तक्रार करु, अन्यथा गौण खनिज माफियांविरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.