लोकमत आॅनलाईन धुळे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारकीच्या राजीनामा देण्याच्या घोषणेनंतर प्रदेश पक्षश्रेष्ठींशी सोमवारी रात्री चर्चेनंतर आमदार अनिल गोटे सकाळी शहरात परतले. नऊ वाजेच्या सुमारास महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत बंदद्वार चर्चा केली. परंतु नेमकी काय चर्चा झाले, काय ठरले याबाबत दोघांनीही बोलण्याचे टाळले. आमदार गोटे यांनी मात्र दुपारी २ वाजता आपली भूमिका जाहीर करू, असे माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले.महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याचा आज शेवटचा दिवस असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीचे नेतृत्व व गुन्हेगारांना उमेदवारी देऊ नये या मुद्यांवर विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा शहराचे आमदार अनिल गोटे यांनी केली होती. मुंबईत पोहचल्यानंतर आधी मुख्यमंत्र्यांशी व दुस-या दिवशी सोमवारी रात्री प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चेनंतर ते आज शहरात दाखल झाले. निवडणुकीत नेतृत्व व गुन्हेगारांना उमेदवारी नाही, या मुद्यावर तडजोड करणार नसल्याचे आमदार गोटेंनी स्पष्ट केले होते. त्यामुळे सोमवारी रात्री बैठकीत काय झाले, काय ठरले याबाबत राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांतही प्रचंड उत्सुकता आहे. पक्षाचे महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी आज सकाळी आमदार गोटे यांच्या निवासस्थानी पोहचले. तेथे दोघांमध्ये अर्धा ते पाऊणतास बंदद्वार चर्चा झाली. त्यानंतर बाहेर येऊन घराच्या ओट्यावर उभे राहून दोघांनी प्रसिद्धी माध्यमांना सस्मित छायाचित्र दिले. पण त्यानंतर महानगर अध्यक्ष अग्रवाल वाहनातून निघून गेले. तर आमदार गोटे हे त्यांच्या कल्याण भवनातील निवडणूक प्रचार कार्यालयात पोहचले. तत्पूर्वी माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना, काय चर्चा झाली, काय ठरले याबाबत विचारले असता त्यांनी दुपारी २ वाजता आपण भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे रात्रीच्या बैठकीत काय ठरले, आज सकाळी आमदारांच्या निवासस्थानी काय चर्चा झाली, या बाबी अद्याप तरी गुलदस्त्यात आहेत. दरम्यान नामनिर्देशन पत्र भरण्याची आज शेवटची मुदत असल्याने पक्षाच्या दोन्ही कार्यालयांमध्ये आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी नेहमीसारखीच गर्दी झाल्याचे चित्र आहे. उमेदवार, त्यांचे समर्थक अर्ज भरताना काही त्रूटी राहू नये, याची दक्षता घेत कार्यकर्त्यांच्या मदतीने अर्ज भरण्यात व्यस्त झाले असून आमदार गोटे यांच्या भूमिकेकडेही साºयांचे लक्ष लागून आहे.