आमदार डॉ. शाह यांनी सांगितले की, टाळेबंदीच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम्प यांची भेट घेतली. यावेळी विदेशातून जवळपास ३०० ते ४०० पदाधिकारी आले होते. त्यांच्यामुळे भारतात कोरोनाचा संसर्ग वाढला असा आरोप करीत जुन्या जिल्हा रुग्णालयाला आपण ७ कोटींचे अनुदान मिळवून दिले. लवकरच तिथे ३०० बेडसचे कोविड केअर सेंटर कार्यान्वित होणार आहे. नागरिकांची सोय होईल.
भाजप पदाधिकाऱ्यांचाही त्यांनी समाचार घेतला. मी केलेल्या कामांवर टीका करण्यास सुरुवात केली. मी केवळ पत्रकबाजी करीत असल्याचा आरोप केला आहे. मात्र त्यात किती तथ्य आहे हे जनता जाणून आहे. वास्तविक कोरोनासाठीच्या लढाईत सर्वात प्रथम आपणच विविध बाबींसाठी निधी उपलब्ध करून दिला. ही बाब भाजप पदाधिकारी यांच्या जिव्हारी लागली आहे. कोरोना काळात मदत करताना मी माझा भाऊ गमावला आहे. एवढे होऊनदेखील इमाने इतबारे माझे काम सुरु आहे. भाजप पदाधिकारी यांनी उगाचच माझ्यावर चिखलफेक करू नये. कोणी माझ्या वाटेला जाऊ नये, कोणी जात असेल तर त्याला मी सोडणार नाही असेही त्यांनी सांगितले. हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पदांची भरती व्हावी यासाठी मी सुरुवातीपासून आग्रही होतो. मंत्रालयात सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे ७८ पदांची प्रक्रिया लवकरच होणार आहे. वेगवेगळ्या कामांसाठी कोट्यवधींचा निधी आणला आहे, असे सांगत महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराबाबत त्यांनी चांगलेच तोंडसुख घेतले.