धुळे : शहरातील रस्त्यांवर, मोकळ्या मैदानांमध्ये तसेच शहराच्या परिसरातील टेकड्यांवर दररोज सकाळी आणि सायंकाळी फिरणाऱ्यांची तोबा गर्दी पहायला मिळत आहे. यातुन कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे माॅर्निंग वाॅक आरोग्यासाठी की कोरोना घरात आणण्यासाठी असे बोलले जात आहे.
कोरोनाची संसर्ग साखळी खंडित करण्यासाठी शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कठोर निर्बंध लागू केले आहेत. अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर पडण्यास मनाई केली आहे. तरी देखील नागरिक कोरोनाला न घाबरता मोठ्या संख्येने फिरायला बाहेर पडत आहेत. धक्कादायक म्हणजे काही जण तर कुटूंबासह फिरायला जात असल्याची चित्र आहे. लहान मुलांना देखील सोबत नेले जाते.
सध्या काही शहरांमध्ये लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग आढळून येत आहे. तसेच कोरोनाची तिसरी लाट आलीच तर त्यात लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचे अंदाज व्यक्त होत आहे. असे असताना लहान मुलांना फिरायला सोबत नेणे धोकेदायक ठरु शकते.
दरम्यान, शाळा बंद असल्याने मोकळ्या मैदानांमध्ये, गल्लीबोळात क्रिकेट आणि इतर खेळ खेळण्यासाठी लहान मुलांची गर्दी होत आहे. या खेळांना देखील आळा घालण्याची गरज आहे. गर्दी होवू नये यासाठी प्रशासनाने जमावबंदी लागु केली आहे. या आदेशाचे संर्रासपणे उल्लंघन होताना दिसत आहे. घरातल्या घरात देखील व्यायाम कराता येतो, असा सल्ला सुज्ञ नागरिक देत आहेत.
पोलिसांकडूनही सूट
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लागु केलेल्या ‘ब्रेक द चेन’ची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांवर दिली आहे. पंरतु विनाकारण फिरणाऱ्यांवर नियंत्रण मिळविण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याचे चित्र आहे. शहरातील तसेच शहराच्या परिसरात मोकळ्या मैदानांवर खेळणारे वाढले आहेत. यात लहान मुलांची संख्या अधिक आहे. दुकाने बंद झाल्यानंतरही शहरात ठिकठिकाणी गर्दी पहायल मिळते. सकाळी आणि सायंकाळी फिरणारऱ्यांची गर्दी असते. एक प्रकारे पोलिसांकडून सूट दिली जात आहे, असेच म्हणावे लागेल.
कोरोनाची भिती वाटते. परंतु आरोग्यासाठी पायी फिरणे किंवा व्यायाम करणे देखील तितकेच महत्वाचे आहे. घरात बसून राहण्यापेक्षा फिरायला गेल्यास हवा मिळते.
- एक नागरिक
माॅर्निंग वाॅकची सवय आधीपासूनच आहे. शिवाय कोरोना होवू नये यासाठी नियमीत व्यायामही आवश्यक आहे. त्यामुळे सकाळच्या मोकळ्या हवेत फिरायला प्राधान्य देत आहे.
- एक नागरिक
खुली हवा नव्हे कोरोनाचे विषाणू
शुध्द आणि खुली हवा मिळते म्हणून नागरिक माॅर्निंग वाॅकसाठी किंवा सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत. परंतु फिरणाऱ्यांची गर्दी असते. त्यात एखादी व्यक्ती लक्षणे नसलेली कोरोनाबाधित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या खुल्या हवेतही कोरोनाचे विषाणू असू शकतात.