धुळे : केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत धुळ्यासह देशभरातील ५५४ रेल्वेस्थानकांच्या सुशोभीकरणासह देशभरातील १ हजार ५०० रोड ओव्हरब्रीज आणि अंडरपासच्या कामांचे औपचारिक शिलान्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन झाले. दरम्यान, खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या पाठपुराव्याने धुळे रेल्वेस्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी तब्बल ९ कोटी ५० लाखांचा निधी उपलब्ध झाला असून काम प्रगतिपथावर आहे.
केंद्र सरकारच्या ४१ हजार कोटींच्या निधीतून धुळे शहरातील रेल्वेस्थानकासह देशभरातील ५५४ स्थानके आणि रेल्वेमार्गांवरील १ हजार ५०० हून अधिक ओव्हरब्रीज आणि अंडरपासच्या कामांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन झाले. त्यानिमित्त सोमवारी सकाळी अकराला येथील रेल्वेस्थानकात झालेल्या कार्यक्रमास खासदार डॉ. सुभाष भामरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, बबनराव चौधरी, गजेंद्र अंपळकर, प्रतिभा चौधरी, प्रदीप कर्पे, ॲड. एम. एस. पाटील, हिरामण गवळी यांच्यासह विविध शाळांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्या १० वर्षांतील रेल्वेच्या प्रगतीचा आढावा घेत भविष्यातील विविध परियोजनांची माहिती दिली.
धुळे रेल्वेस्थानकात विविध सोयी-सुविधा
या कार्यक्रमात खासदार डॉ. भामरे म्हणाले, अमृत भारत स्टेशन विकास योजनेत धुळे स्थानकाचा समावेश करून घेण्यात यश मिळाले. यात धुळे रेल्वेस्थानकाचे आधुनिकीकरण होत असून, प्रवाशांना या स्थानकात अनेक सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत. यासाठी ९ कोटी ५० लाखांचा निधी मिळविला. या निधीतून येथील रेल्वेस्थानकाला दोन प्रवेशद्वारांसह प्रशस्त लॉबी, पाथ वेसह पार्किंगमध्ये अनेक सोयी-सुविधा, प्लॅटफॉर्मवर सीओपीची सुविधा, नवीन अत्याधुनिक शौचालये, प्रवाशांसाठी आसनव्यवस्थेसह वेटिंग एरियामध्ये फर्निचरसह विविध सोयी-सुविधा, पाणी व्यवस्था, रेल्वेस्थानकाच्या इमारतीचे सौंदर्यीकरण, तसेच वेटिंग रूम, बुकिंग ऑफिस, प्रवेशद्वाराचे इंटेरिअर, प्रवाशांच्या माहितीसाठी इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड आदी सोयी-सुविधांचा समावेश आहे.
यावेळी रेल्वेचे नोडल ऑफिसर शरद कोटेचा, दयाशंकर द्विवेदी, स्थानक अधीक्षक संतोष जाधव, नंदकुमार पाटील, भुसावळचे मुख्य कार्यालयीन अधीक्षक उमाकांत बावस्कर आदींनी संयोजन केले. बावस्कर यांनी सूत्रसंचालन केले.