धुळे - कोरोनामुक्त झालेल्या काही रुग्णांना आता म्युकरमायकोसिसचा त्रास जाणवत आहे. मात्र, हा आजार संपर्कामुळे होत नाही. जिल्ह्यात आतापर्यंत १८६ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४७ रुग्ण बरे झाले आहेत, तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सध्या १३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या आजाराच्या उपचारात उपयुक्त ठरणाऱ्या इन्फोटिसिरीन बी या इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. सध्या दररोज किमान २५० इंजेक्शनची गरज भासत आहे. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वगळता इतर खासगी रुग्णालयांकडे इंजेक्शन उपलब्ध नाहीत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ७९ इंजेक्शन उपलब्ध आहेत. सध्या प्राप्त होत असलेले इंजेक्शन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राधान्याने दिले जात आहेत. मात्र, लवकरच रेमडेसिविर इंजेक्शनच्या वाटपप्रणालीप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्माण करून खासगी रुग्णालयांतही पुरवठा करणार असल्याचे जिल्हा कोरोना नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील यांनी सांगितले.
पूर्ण खर्च उचलण्याबाबतचा शासन आदेश
म्युकरमायकोसिस आजाराचा खर्च किमान आठ लाख रुपयांपर्यंत येतो. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत म्युकरमायकोसिसचा समावेश करण्यात आला आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून सर्व खर्च करण्याचे आदेश शासनाचे आहे. धुळ्यात सहा हॉस्पिटलमध्ये या आजारावर महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार केले जाणार आहेत.
म्युकरमायकोसिस आजारात महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेणारा पहिला रुग्ण
म्युकरमायकोसिस आजाराचा संपूर्ण खर्च जनआरोग्य योजनेतून करण्याबाबत शासन आदेश प्राप्त झाले आहेत. राज्यात म्युकरमायकोसिस आजारावर योजनेंतर्गत मोफत उपचार घेणारा पहिला महिला रुग्ण धुळ्यातील आहे.
- समीर खान, जिल्हा व्यवस्थापक, जनआरोग्य योजना