नंदुरबार,दि.9- जिल्ह्यातील तीन लाख 76 हजार 700 सातबारा उतारांचे संगणकीकरण झाले आहे. नाशिक विभागात हे काम करणारा नंदुरबार पहिला तर राज्यात पाचवा ठरला आहे. दरम्यान, संगणकीकृत झालेला सातबारातील चुका किंवा त्रुटी दूर करण्यासाठी 15 जूनर्पयत चावडी वाचन कार्यक्रम घेण्यात येवून त्यात सुधारणा करण्यात येणार आहे. 1 ऑगस्टपासून डिजीटल स्वाक्षरी आणि बारकोड असलेला सातबारा नागरिकांना मिळाणार आहे.
राज्यात केंद्र पुरस्कृत डिजीटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायङोशन प्रोगाम कार्यान्वीत करण्यात आला आहे. त्याअंतर्गत सर्व गावांमधील अधिकार अभिलेख पुनर्लिखीत केले आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख नोंदवह्या नियमाअंतर्गत सातबारा व आठ अ तयार करण्यासाठी 1 मे पासून चावडी वाचन मोहिम सुरू करण्यात आली आहे.
जिल्ह्यात एकुण तीन लाख 80 हजारार्पयत सातबारा उतारे आहेत. त्यापैकी तीन लाख 76 हजार 695 सातबारा उतारांचे संगणीकरण करण्यात आले आहे. नंदुरबार व शहादा तालुके हे मोठे आहेत. शिवाय दोन्ही शहरे देखील मोठी आहेत. त्यामुळे या दोन्ही तहसील कार्यालयांनी वेळेत काम पुर्ण करून या मोहिमेला मोठा हातभार लावला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी दिली.