आॅनलाइन लोकमतधुळे : आजच्या काळात केवळ ज्ञान असून चालणार नाही. त्यासोबत कौशल्याची गरज आहे. अभियांत्रिकीसारख्या पदव्या घेऊनदेखील पदवीधर अपयशी होतात. परीक्षेत गुण असतात, परंतु कौशल्याचा अभाव असल्याने, जीवनात खच्चीकरण होते. म्हणून सॉफ्ट स्किल्स, जीवन कौशल्य, संप्रेषण कौशल्य, रोजगारक्षमता कौशल्य आदींची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. घनश्याम अयंगार (बिलासपूर, छत्तीसगढ) यांनी येथे केले.जयहिंद शैक्षणिक संस्था संचलित झुलाल भिलाजीराव पाटील महाविद्यालय, इंग्रजी विभाग आणि एल्टाई खान्देशच्यावतीने ‘सॉफ्ट स्किल्स, जीवन कौशल्य, संप्रेषण कौशल्य’ या विषयावर एकदिवसीय राष्टÑीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यशाळेच्या उदघाटनाप्रसंगी प्रा. डॉ. घनश्याम अयंगार बोलत होते.अध्यक्षस्थानी जयहिंद शैक्षणिक संस्थेच्या संचालिका स्मिता साळुंखे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. सविता देवगीरीकर (नागपूर), प्रा. सुरेश पांडे (जळगाव) उपस्थित होते.यावेळी बोलतांना डॉ. घनश्याम अयंगार यांनी सकारात्मक दृष्टीकोन, देहबोली, सांघिक कार्य, आत्मविश्वास, नेतृत्वगुण, मुलाखत कौशल्य, सृजनात्मकता, वेळेचे नियोजन, तणाव व्यवस्थापन आदी विषयांवर प्रकाश टाकला. आजच्या स्पर्धेच्या युगात अधिक कौशल्य जोपासणे, महत्वाचे आहे असे त्यांनी सांगितले.प्रा. डॉ. सविता देवगीरकर यांनी सॉफ्ट स्किल्स आणि जीवन कौशल्य यातील प्राथमिक फरक सांगितला. जीवन जगणे ही एक कला आहे, आणि ती कोणीही समृद्ध करू शकतो असे त्यांनी सांगितले.प्रा. सुरेश पांडे म्हणाले, साक्षर असो वा निरक्षर, प्राणी असो वा मानव सर्वजण संप्रेषण करतात. परंतु आपल्या कार्यातून, देहबोलीतून आणि संभाषणातून काम करून घेण्याची कला अवगत करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक क्षेत्रात अशा कौशल्यांची नितांत गरज असल्याचे त्यांनी सांगितले.अध्यक्षीय मनोगतात स्मिता साळुंखे यांनी आजच्या युगातील इंग्रजीचे महत्व आणि सोबत संप्रेषण आणि संभाषण कौशल्य याचे महत्व उपस्थितांना सांगून, विविध कौशल्य जोपासण्याचे आवाहन केले. विद्यार्थी आणि शिक्षक उपयोगी कार्यशाळेचे आयोजन नित्याने व्हावे असेही त्या म्हणाल्या.सूत्रसंचालन प्रा.डॉ. वैभव सबनीस यांनी केले. कार्यशाळेचा आढावा प्रा. वर्षा पाटील यांनी घेतला. राजवंश चीमा, प्रा. रीमा काल्डा, प्रविण शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यशाळेत ३०० विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापकांनी सहभाग घेतला.