निजामपूर : साक्री तालुक्यातील माळमाथ्यावर निजामपूरजवळ असलेले उभरांडी गाव अजूनही विकासापासून वंचित आहे. या गावाचा विकास व्हावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा करुनही अनेक वर्षांपासून हे गाव उपेक्षितच राहिले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.उभरांडी हे लहानसे गाव स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षे होऊनही विकास कामांच्या बाबतीत मागे राहिले आहे. होडदाणे व उभरांडी गावे मिळून ग्रुप ग्रामपंचायत आहे.परंतू ग्रामपंचायत कार्यालय खूप जुने असून त्यात कपाटे, २ टेबल आणि १० खुर्च्या ठेवल्या तर जेमतेम १५ ते १६ लोक बसू शकतील. १८०० वस्तीच्या गावाची ग्रामसभा होणे अशक्य आहे. त्यातच आॅनलाईन यंत्रणा कुठे ठेवावी, असा प्रश्न आहे.विविध ग्रामविकासाची कामे व्हावीत, यासाठी ग्रामपंचायतीची सातत्याने लोप्रतिनिधींकडे फिरफिर सुरु असते. मात्र, अद्यापपर्यंत खासदार निधीतून एकही काम झालेले नसल्याचे उभरांडीच्या सरपंच विनिता नारायण पाटील यांनी सांगितले.उभरांडी ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठयाच्या विहीरीला भरपुर पाणी आहे. मात्र, त्या पाण्यात क्षाराचे प्रमाण अतिशय जास्त असून ते मळकट लागते. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी ते पाणी धोकेदायक आहे. म्हणून गावासाठी १५०० लिटरच्या पाणी फिल्टर प्लांटची नितांत गरज निर्माण झाली आहे.गावात सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटारी नाहीत. ग्रामपंचायतीने काही ठिकाणी थोडयाफार गटारी केल्या आहेत. मात्र, गावभर उघडया गटारीतून दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असते. अंडरग्राऊंड गटारी करिता शासन निधीची गरज आहे.गावात पूर्वीचे मातीचे रस्ते आहेत. आदिवासी वस्तीत थोडे काँक्रीट रस्ते झाले आहेत. गावात रस्ते व्हावेत यासाठी निधी नाही. पेव्हरब्लॉक बसवणे गरजेचे झाले आहे. शिवाय गावात समाजमंदीराची नितांत आवश्यकता आहे. लहान-लहान गावात आमरधाम आहेत. मात्र, या गावासाठी अमरधाम नाही. गाव दरवाजा नाही.निजामपूरकडून गावाकडे येणारा रस्ता अत्यंत खाचखळग्याचा आहे. रस्त्याच्या उर्वरित भागाचे पुननिर्माण होण्यासाठी लोकप्रतिनिधींकडे अनेक खेटे घातल्याचे सरपंच प्रतिनिधी नारायण हरी पाटील यांनी सांगितलेसदर कामांसाठी मोठया प्रमाणात निधीची आवश्यकता असतांना ग्रामपंचायतीला १४ व्या वित्त आयोगाअंतर्गत केवळ रुपये ६ लाख रुपये इतका निधी मिळतो. त्यातून सरकार सेवा केंद्राकरीता रुपये १ लाख ४७ हजार निधी द्यावा लागतो. उर्वरित रक्कमेतून विकासाची मोठी कामे करणे ग्रामपंचायतीला शक्य होत नाही. त्यामुळे गावाच्या विकास खुंटला आहे. यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
उपेक्षित उभरांडी गाव विकासापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 11:08 PM