धुळे: धुळे जिल्हयाच्या माजी पालकमंत्री डॅा. शोभा बच्छाव यांना कॅांग्रेसतर्फे धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली. कॅांग्रेसने या मतदारसंघातून प्रथमच महिलेला उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता कॅांग्रेस, भाजप व वंचित असा तिरंगी सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
धुळे लोकसभा मतदारसंघातून कॅांग्रेसतर्फे धुळे जिल्हाध्यक्ष शाम सनेर यांच्यासह डॅा. तुषार शेवाळे, डॅा. शोभा बच्छाव यांच्या नावाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर कॅांग्रेसने बुधवारी सायंकाळी डॅा. बच्छाव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
डॅा. बच्छाव यांचे वडिल धुळ्यात शासकीय नोकरीला असल्याने, त्यांचे प्राथमिक शिक्षण धुळ्यात झालेले आहे. त्या नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील पिंपळगाव वाखारी येथील रहिवासी असून, त्यांची सासरवाडी मालेगाव मध्य मतदारसंघातील सोनज येथील आहे.डॅा. बच्छाव या २००९ मध्ये धुळे जिल्हयाच्या पालकमंत्री होत्या. तर सध्या धुळे जिल्हा कॅांग्रेसच्या प्रभारी आहेत.
दरम्यान धुळे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. याठिकाणी कॅांग्रेस, भाजप व वंचित अशी तिहेरी लढत होण्याची दाट शक्यता आहे.