लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे केलेल्या पाहणीत जिल्हयातील २१ गावांमध्ये दूषित पाणी, घाणीचे साम्राज्य व अन्य कारणे आढळून आली. त्यामुळे जि.प. प्रशासनातर्फे संबंधित २१ गावांच्या ग्रामपंचायतीला नोटीसा बजविण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रत्येक जिल्हयात स्वच्छ सर्वेक्षण करण्यात आले. धुळे जिल्हयातही १ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे सर्वेक्षण करण्यात आले होते. महिनाभर चाललेल्या सर्वेक्षणात जिल्हयातील २१ गावांमध्ये दुषित पाणी आढळून आले. तसेच या गावांमध्ये पाण्याची टाकीची दुरवस्था, जलवाहिन्यांना गळती, ठिकठिकाणी उकीरडा पडल्याची विदारक स्थिती आढळून आली. त्यानुसार ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे संबंधित सर्व गावांच्या ग्रामपंचायतींना नोटीसा देण्यात आल्या आहेत. या सर्व ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड वाटप करण्यात आले आहे. या कार्डमध्ये सर्वेक्षणात संबंधित गावांमध्ये ज्या त्रुटी आढळून आल्या आहे. त्याचा उल्लेख करण्यात आला असून गावांमध्ये आढळून आलेल्या त्रुटी तत्काळ दूर कराव्यात, असे निर्देश संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आले आहे. तसे ग्रामपंचायतींनी केले तर ग्रामपंचायतींना ग्रीन कार्ड दिले जाणार आहे. या ग्रामपंचायतींना दिल्या नोटीसा धुळे : नवलाणे, देउळ खुर्द, बांभुर्ले, शिरडाणे प्र. ने, खंडलाय बुद्रूकसाक्री : बसरावळ, बोपखेल, कुडाशी, मळगाव, सुकापूर, शेवगे, विरखेल, कासारे, तामसवाडी, मालनगाव, घोडदेशिंदखेडा : सोनेवाडी, वरपाडा, सुकवदशिरपूर : उंटावद व सावळदे
धुळे जिल्हयातील २१ ग्रामपंचायतींना नोटीसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 9:34 PM
स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत पाहणी : दूषित पाणी, घाणीचे साम्राज्य आढळले
ठळक मुद्देपावसाळयानंतर पुन्हा होणार सर्वेक्षण जिल्हयात स्वच्छ सर्वेक्षण पावसाळयानंतर पुन्हा केले जाणार आहे. हे सर्वेक्षण १ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत केले जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, ज्या ग्रामपंचयतींना नोटीसा बजविण्यात आल्या आहेत, त्या ग्रामपंचायतींनी गावात स्वच्छता करावी; असे निर्देश देण्यात आले आहेत.