धुळे शहरात गेल्या आठवड्यात प्रातांधिकारी भीमराज दराडे आणि त्याआधी पोलीस निरीक्षकांच्या घरावर चोरट्यांनी हात साफ केल्याची घटना घडली. शहरात दिवसाढवळ्या चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. त्यात देवपूर परिसरात दोन आणि शहरात एक घराचा समावेश आहे. या घटना पाहता शहरात पुन्हा एकदा चोरट्यांनी डोके वर काढले आहे. त्यांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे स्पष्ट होते.
प्रातांधिकारी भीमराज दराडे यांच्या घरासमोरच अतिरिक्त पोलीस अधीक्षकांचे घर आहे. घराबाहेर पोलिसांचा खडा पहारा असतो. असे असताना समोरच राहणाऱ्या प्रातांधिकारी यांच्या घरावरच चोरट्यांनी डल्ला मारला. चोरी कितीची झाली, हा गौण भाग आहे. पण घराबाहेर दिव्याची गाडी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांचे घर असताना चोरट्यांनी न घाबरता हात साफ केला. त्याआधी चोरट्यांसाठी कर्दनकाळ समजल्या जाणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या घरावरच चोरट्यांनी हात साफ केला. या दोन्ही घटनांचा विचार केला तर शहरात पोलीस अधिकारी व महसूल अधिकाऱ्यांचे घर सुरक्षित नाही, मग सर्वसामान्य जनतेचा तर विचार न केलेलाच बरा, असेच म्हणावे लागेल.
दिवसाढवळ्या घरात चोरी करण्याच्या घटनाही वाढतच चालेल्या आहेत. देवपुरात दोन आणि धुळ्यातील मिल परिसरात गेल्या एक ते दीड महिन्याच्या काळात अशा चोऱ्या झाल्या आहेत.
अन्य जिल्ह्यात विकासाचा आलेख वाढताना दिसतो. याउलट धुळ्यात मात्र खून, लूट, मोटारसायकल चोरी, घरफोडी सारख्या वाढत्या घटनांमुळे गुन्हेगारीचा आलेख हा वाढताना दिसत आहे.
मोटारसायकल चोरीची घटना तर आता सायकल चोरीसारखीच झाली आहे. मोटारसायकल चोरी झाल्यानंतर लगेच त्याची फिर्याद घेण्यास पोलीस टाळाटाळ करतात. आधी नातेवाईकांकडे व आजूबाजूच्या परिसरात शोध घ्या, असा सल्ला दिला जातो, अशी नागरिकांची तक्रार आहे. तरीही नाही सापडली तर मग आठ - दहा दिवसांनी मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल होतात. त्यांचा शोध मग केव्हा लागेल, हे सांगणेच नको.
असे नाही की पोलिसांनी गुन्ह्याचा शोध घेतला नाही. जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात पोलिसांनी मोटारसायकल चोरीसह अन्य चोरीचे गुन्हे उघडकीस आणले.
मुंबई पोलिसांची बनावट पिस्तुलची कारवाई - जिल्ह्यात सुरू असलेले बनावट दारूचे मिनी कारखाने पोलिसांनी ध्वस्त केले. तसेच बनावट पिस्तूलही पकडल. जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी बनावट पिस्तूलप्रकरणी विशेष मोहीमही राबविली होती. त्यात अनेकांना अटक करून पिस्तूल हस्तगत करण्यात यशही आले होते. पण असे असताना गेल्या आठवडयात मुंबई पोलिसांचे एक पथक धुळ्यात आले. त्यांनी येथून एकाला बनावट पिस्तुलासह पकडले. या प्रकरणात पोलीस बाॅयसह खाकीतील काही कर्मचारी आणि अधिकारीही ‘इन्व्हाॅल’ असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यांची मुंबई पोलीस गेल्या तीन दिवसापासून चौकशी करत असल्याचीही पोलीस वर्तुळात चर्चा आहे.
गांजाची शेती - जिल्ह्यात मध्यप्रदेशाच्या सीमेवर सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात गांजाची शेती केली जाते. त्या अतिदुर्गम भागापर्यंत पोलीस अधीक्षक हे पायी पोहचले होते. ती सर्वात मोठी कारवाई होती. त्यानंतर पोलिसांनी त्या परिसरात आणि सीमेवर धाडी टाकून मोठ्या प्रमाणावर लाखोंचा गांजाही जप्त केला होता. परंतु नंतर गांजाच्या शेतीत काही खाकीतील लोक पार्टनर असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला. त्यानंतर या प्रकरणाकडे बघण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन बदलला.
शहरातून विविध गुन्ह्यांतील गुंडांना तडीपार करण्याचा धडाका कोरोना काळाआधी पोलिसांनी लावला होता. यामुळे नक्कीच शहरातील गुंडगिरी व गुन्हेगारीवर आळा बसेल, असा विश्वास नागरिकांना होता. पोलिसांच्या कामगिरीवर नागरिक खूश होते. परंतु झाले उलटच तडीपार झालेले गुंड सर्रासपणे शहरात फिरताना दिसू लागले. मग अशा तडीपार झालेल्या गुंडांना पकडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. मात्र, तडीपार गुंडांची शहरात येण्याची हिंमतच कशी होते, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांना पडला होता.
या सर्वांमागे एक कारण मुख्य आहे की, जिल्ह्यात खाकीची आधी असलेली जरब आता दिसत नाही. ती जरब पुन्हा निर्माण करण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कुठल्याही राजकीय दबावाखाली न येता कुठल्याही गुन्ह्यातील जे दोषी आहे, मग ते कोणीही असोत, त्यांच्यावर कडक कारवाई केलीच पाहीजे. शहरात सर्व कायदे धाब्यावर बसवून कोणालाही न घाबरता कानठळ्या फोडणारे सायलन्सरचे फटाके फोडत बुलेटवर सुसाट वेगाने जाणाऱ्यांना त्यांची जागा दाखविली पाहीजे. कर्तव्य बजाविताना कोणावर गय करता कामा नये, असे केले तरच पोलिसांची प्रतिष्ठा वाढून पुन्हा गुंडामध्ये आणि दादा लोकांच्या मनात जरब निर्माण होऊन जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था पुन्हा चांगली होईल.