धुळे : कोरोनाचा संसर्ग अजुनही सुरूच आहे. काही जिल्हे हाॅटस्पाॅट आहेत. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे यंदा देखील शाळा बंदच राहण्याची शक्यता आहे.
कोरोनामुळे वर्षभर लहान मुलांची शाळा बंद होती. शाळेत जाता येत नाही किंवा बाहेरही पडता येत नसल्याने मुलांमध्ये चिडचिडपणा वाढला असून काही मुलांना टीव्ही, मोबाइल पाहण्याची सवय लागली आहे. मस्ती करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे वर्षभरापासून पालक मुलांना सांभाळून हैराण झाले आहेत. दरम्यान, दिवाळीपर्यंत मोठ्या मुलांच्या शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. परंतु पूर्व प्राथमिकचे वर्ग कधी सुरू होतील याची काहीही शाश्वती नाही. यंदा देखील शाळेचे दर्शन होणे कठीण आहे. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे.
वर्षभरापासून सतत घरी राहून लहान मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. अशावेळी पालकांनी मुलांना पूर्ण वेळ देण्याची गरज मानसशास्त्र तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मुलांसोबत पूर्ण वेळ घालवण्याची संधी पालकांना मिळाली आहे. या संधीचे सोने करून त्यांच्यासोबत विविध प्रकारचे घरगुती खेळ खेळणे, चित्रकला, क्राफ्ट, व्यायाम यामध्ये मुलांचे मन गुंतवून त्यांच्या कलागुणांना वाव देण्याची गरज आहे. घरी आहेत म्हणून केवळ अभ्यासाचा आग्रह न धरता मनमोकळेपणाने व्यक्त होण्याची संधी पालकांनी दिली पाहिजे.
वर्षभर कुलूप; यंदा?
कोरोना संसर्गाची परिस्थिती पाहता पूर्व प्राथमिकचे वर्ग आणखी वर्षभर सुरू होण्याची शक्यता नाही. त्यामुळे यंदा मुलांच्या अभ्यासाचे नियोजन पालकांना करून दिले आहे. त्यासोबतच खेळ आणि कलागुणांना वाव देण्याचा आग्रह आम्ही पालकांकडे धरला आहे. लहान मुले घरी चांगला अभ्यास करतात.
- विनायक चव्हाण, शाळा चालक
कोरोनाचा संसर्ग असल्याने शाळा बंद आहेत. परिस्थिती सुधारली तरी आधी ८ वी ते १० वी चे वर्ग सुरू होतील. त्यानंतर ५ वी ते ७ वी, नंतर पहिली ते ४ थी आणि त्यानंतर पूर्व प्राथमिकच्या वर्गांचा विचार होऊ शकतो. शासनाच्या निर्देशांचे आम्ही पालन करत आहोत. पुढील आदेशाची प्रतीक्षा आहे.
- विलास वारुडे, धुळे
कोरोनाच्या बाबतीत पुढे काय परिस्थिती येणार आहे हे सांगणे कठीण आहे. परंतु पुढचे दोन महिने तरी पूर्व प्राथमिकचे वर्ग सुरू होणार नाहीत. परिस्थिती सुधारली, कोरोनावर औषधे आली, पालकांचा विश्वास बसला तर दिवाळीनंतर वर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. त्याआधी मोठ्या मुलाचे वर्ग सुरू होतील. टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया चालेल.- हेमंत घरटे, शाळा चालक
पालकही परेशान
गेल्या दीड वर्षापासून मुले घरीच आहेत. शाळेत किंवा बाहेरही जाता येत नसल्याने त्यांच्यात चिडचिड वाढली आहे. मस्ती वाढली आहे. कंटाळलो आहोत. संताप होतो. परंतु कोरोनाचा संसर्ग असल्याने मुले घरात सुरक्षित असल्याचे समाधान आहे.
- संतोष शिरसाठ, सोनगीर
कोरोनामुळे शाळा बंद आहे. मुले घरातच असल्याने टीव्ही आणि मोबाइलचा नाद लागला आहे. मुलांमध्ये चिडखोरपणा वाढला आहे. दिवसभर मस्ती करीत असतात. कागदांचा कचरा करतात. त्यामुळे आम्ही देखील कंटाळलो आहोत. कधी शाळा सुरू होईल?
- रूपाली धनगर, धुळे
दुपारपर्यंत ऑनलाइन शाळा असते. त्यानंतर मुले अभ्यास करतात. असे असले तरी शाळेत जाता येत नाही किंवा बाहेरही पडता येत नाही म्हणून मुलांमध्ये चिडचिड वाढली आहे. त्यांना चित्रकला आणि इतर घरगुती खेळांमध्ये गुंतवून ठेवणे गरजेचे आहे.
- अश्विनी चिलाणेकर, धुळे
मुलांच्या मानसिकतेवरही परिणाम; ही घ्या काळजी
विभक्त कुटुंबरचना व इलेक्ट्रॉनिक्स फ्रेंड्समुळे मुले एकलकोंडी होत आहेत. मुलांची कल्पकता संपते आहे. मुलांसोबत गप्पागोष्टी, खेळ यातच पालकांनी रमले पाहिजे. मुलांची भावनिक बुध्दिमत्ता वाढविण्यासाठी आनंद, दुःख, राग, भीती या भावना शिकवा मुलांना. मुलांना इलेक्ट्रॉनिक्स फ्रेंडशिपपासून लांब ठेवा त्याचे दुष्परिणाम भविष्यात कधीच भरून काढू शकत नाही, असे आहेत. शाळा बंद असल्याने मुले पूर्णवेळ पालकांसोबत आहेत. मुलांना वेळ द्या. - प्रा. वैशाली पाटील, बालमानसशास्त्र तज्ज्ञ