आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांमधील शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुटीतही पोषण आहार देण्यात येणार आहे. सरासरी ४० दिवस हा आहार दिला जाईल. यासंदर्भात शिक्षण संचालक (प्राथमिक) सुनील चौहान यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना या संदर्भात पत्र पाठविलेले आहे.गेल्यावर्षी जिल्हयात पावसाचे प्रमाण अतिशय कमी होते. खरीपाचे अपेक्षित उत्पन्न आले नाही. ज्या गावांची खरीपाची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे, तेथे शासनातर्फे दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये जिल्ह्यातील धुळे, शिंदखेडा, शिरपूर व साक्री या चारही तालुक्यांचा समावेश आहे.विद्यार्थ्यांना शाळा कालावधीत पोषण आहार देण्यात येतो. मात्र आता वार्षिक परीक्षा आटोपल्यानंतरही या दुष्काळग्रस्त गावातील जिल्हा परिषदेसह खाजगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुटीतही पोषण आहार देण्यात येणार आहे.जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळा, त्याचबरोबर खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुटीत पोषण आहार दिला जाणार आहे. पहिली ते आठवी पर्यंतच्या जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना १०० तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दररोज १५० ग्रॅम आहार दिला जाईल असेही सांगण्यात आले. उन्हाळ्याच्या सुटीत सरासरी ४० दिवस पोषण आहार देण्याचे नियोजन असते. एप्रिल अखेरपर्यंत अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असतात. त्यामुळे तेथे पोषण आहार नियमित मिळत असतो. मे महिना तसेच जून महिन्याच्या १३ किंवा १४ तारखेपर्यंत पोषण आहार दिला जाईल.दूध अंडी,फळ देण्याचे आदेशया पोषण आहारांतर्गत आठवड्यातून तीन दिवस विद्यार्थ्यांना दूध, अंडी, फळे, पौेष्टीक आहार देण्यात यावा असे आदेशात म्हटले आहे. मात्र यासाठी उन्हाळी कालावधीत विद्यार्थ्यांची बायोमेट्रीक हजेरी घेतली जाणार आहे. हजेरीचे प्रमाण बघूनच शाळेतील विद्यार्थ्यांना दूध, अंडी, फळे देण्यात येतील असेही सांगण्यात आले.
उन्हाळ्याच्या सुटीतही मिळेल विद्यार्थ्यांना पोषण आहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 11:45 AM
जिल्ह्यातील चारही तालुक्यांना लाभ, जि.प.सह खाजगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना ४० दिवस मिळणार आहार
ठळक मुद्देजिल्ह्यातील चारही तालुक्यांना लाभसरासरी ४० दिवस मिळणार पोषण आहारदूध,अंडी, फळे देण्याचेही आदेश