लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जुने जिल्हा रुग्णालयाच्या डागडुजीचे काम ७० टक्के मार्गी लावण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला यश आले आहे़ उर्वरीत ३० टक्के काम पुर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत़ कामाची प्रगती पाहता सर्वोपचार रुग्णालय अवघ्या महिन्याभरात पूर्ण क्षमतेने सुरु होईल, अशी आशा आहे़ यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील दुजोरा दिला़ दरम्यान, या कामी माजी आमदार प्रा़ शरद पाटील यांचा सातत्याने शासनाकडे पाठपुरावा सुरु होता़ धुळ्यातील सर्वोपचार रुग्णालय धुळ्यापासून ८ किमी अंतरावर लांब असणाºया शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात स्थलांतरीत करण्यात आले़ परिणामी ५ ते साडेपाच लाख लोकसंख्येच्या शहरासह आजुबाजुच्या खेड्यांची आरोग्यसेवा कोलमडून पडली़ धुळ्यात त्याच मध्यवर्ती ठिकाणी असणारे जुने जिल्हा रुग्णालय तात्काळ सुरु करावे अशी मागणी धुळेकरांची असल्याने माजी आमदार प्रा़ शरद पाटील यांनी शासनाने पाठपुरावा सुरु केला होता़ जुने जिल्हा रुग्णालयाच्या इमारती या १६ मार्च २०१६ पासून विनावापर पडून असल्याने त्या वापरायोग्य आहेत किंवा नाहीत, यासाठी शासनाने अभिप्राय मागविले होते़ त्यानुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी ही इमारत किरकोळ दुरुस्ती केल्यानंतर वापरण्यास योग्य होतील, असे सुचित केले होते़ त्यानंतर कार्यकारी अभियंत्यांनी सर्व त्रुटींची पुर्तता करुन नकाशे, अंदाजपत्रके प्रशासकीय मान्यता, संरचना, लेखापरिक्षण अहवालासह शासनाने सादर केले होते़ त्यानंतर रुग्णालय दुरुस्तीसाठी २ कोटी ७३ लाखांपेक्षा जास्त निधीची आवश्यकता असल्याचे समोर आले होते़ जुने जिल्हा रुग्णालय हे सध्या बंद अवस्थेत असून याठिकाणी कुठलाही कर्मचारी वर्ग नाही़ इमारती, खिडक्या, पंखे आदी मोडकळीस आलेल्या आहेत़ सर्व आॅपरेशन थिएटर व शौचालयाची दुरवस्था झालेली आहे़ परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य असून रुग्णालय सुरु करण्याबाबत ६ सप्टेंबर २०१७ रोजी तत्कालिन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मंत्र्यांच्या दालनात संबंधित अधिकाºयांची बैठक बोलाविण्यात आली होती़ त्यानंतर रुग्णालय सुरु करण्यासाठी दुरुस्तीसाठी ३ कोटींचा निधी देण्याबाबत एकमत झाले होते़ असे असलेतरी सदर रुग्णालयाची पुन्हा एकदा पाहणी करुन अहवाल देण्याचे ठरले होते़ जिल्हा शल्यचिकित्सकांनी संपुर्ण दुरुस्तीशिवाय रुग्णालय सुरु करता येणार नाही असा अभिप्राय कळविला होता़ आरोग्य मंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मनोजकुमार महाले यांनी रुग्णालयाची पाहणी केली होती़ नाशिक विभागाच्या आरोग्य उपसंचालक घोडके यांनी देखील २८ सप्टेंबर २०१७ रोजी रात्रीच्यावेळी संपुर्ण इमारतीची पाहणी करुन सदर रुग्णालय दुरुस्तीशिवाय शक्य नाही असा अभिप्राय दिला होता़ माजी आमदारांचा शासनाकडे पाठपुरावाजुने जिल्हा रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरु होण्यासाठी माजी आमदार प्रा़ शरद पाटील यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला़ त्याशिवाय त्यांनी काही मागण्या सादर केल्या आहेत़ त्यानुसार, रुग्णालयाच्या मागील प्रवेशद्वार बंद करुन एकच गेट सुरु करावे़ याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे सुरु करावेत़ रुग्णालय आवारातील गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांचे सुरक्षा पथक नेमण्यात यावे़ चोºया थांबविण्यासाठी दिवस आणि रात्र पाळीतील सुरक्षा रक्षक आणि बंदुकधारी पथकाची नियुक्ती करावी अशी मागणी माजी आमदार प्रा़ शरद पाटील यांनी केलेली आहे़
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रुग्णालय इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे़ ७० टक्के काम मार्गी लावण्यात आले असून उर्वरीत काम महिन्याभरात पूर्ण होईल़ - विनोद भदाणे, कार्यकारी अभियंता
जुने जिल्हा रुग्णालयाच्या डागडुजीचे काम अंतिम टप्प्यात पोहचले आहे़ रुग्णालयासाठी शासनाकडून २१० पदांना मंजुरी मिळाली आहे़ जूनपर्यंत संपुर्ण काम मार्गी लागेल़ त्यानंतर रुग्णालय सुरु होईल़ - डॉ़ संजय शिंदे