धुळे : शिरपूर तालुक्यातील घोडसगाव शिवारातील पत्र्याच्या शेडमधून सुमारे दीड लाखाचा कापूस चोरट्याने लंपास केला. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी बुधवारी दुपारी थाळनेर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
नंदलाल प्रल्हाद गुजर (वय ३८, रा. मारुती मंदिराजवळ, घोडसगाव, ता. शिरपूर) यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, घोडसगाव शिवारात गुजर यांचे शेत आहे. शेतानजिक त्यांनी पत्र्याचे शेड उभारले असून त्यात कापूस ठेवलेला होता. कोणीही नसल्याची संधी चोरट्याने साधली आणि पत्र्याच्या जाळीला लावलेले कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करत अंदाजे १९ ते २० क्विंटल, १ लाख ४० हजार रुपये किमतीचा कापूस शिताफीने लांबविला.
चोरीची ही घटना ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ ते ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. सकाळी नेहमीप्रमाणे शेतात आल्यानंतर त्यांना शेडला लावलेले कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यातून कापूस लांबविल्याचे लक्षात येताच त्यांनी थाळनेर पोलिस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली. त्यानुसार, दुपारी सव्वा चार वाजता घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.