जिल्ह्यातील खातेदार शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ॲपला चांगला प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत १ लाख ४४ हजार २५९पेक्षा अधिक खातेदार शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ॲपवर पिकांची नोंदणी केली. तरीही ४० हजार ११२ खातेदार शेतकऱ्यांनी ॲपवर ई-पीक पेऱ्याची नोंदणी केलेली नाही. सर्व्हर कनेक्ट न होणे, मोबाइल फोनमध्ये रेंज नसणे, अँड्रॉइड मोबाइल जवळ नसणे यासह विविध अडचणी शेतकऱ्यांना येत आहेत.
राज्य शासनाने १५ ऑगस्टपासून 'माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीकपेरा' ही ई-पीक पाहणी मोहीम सुरू केली. त्यानुसार तलाठी, मंडळाधिकारी, कृषी सहायक यांनी गावोगावी जाऊन ई-पीक पाहणी या मोबाइल ॲपमध्ये माहिती कशी भरावी, यासंदर्भात प्रात्यक्षिक स्वरूपात शेतकऱ्यांना माहिती दिली आहे.
तालुकानिहाय माहिती अशी
जिल्ह्यात एक लाख ८४ हजार ३७१ रजिस्टर खातेदार शेतकरी आहेत. यापैकी एक लाख ४४ हजार २५९ शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ॲप डाऊनलोड करून त्यावर पीकांची माहिती भरली आहे. धुळे तालुक्यातील ५५ हजार ७८८ खातेदार शेतकऱ्यांपैकी ४३ हजार ५३० शेतकऱ्यांनी ई पीक पेरा लावला आहे. शिरपूर तालुक्यातील २८ हजार ५९४ पैकी २४ हजार ५०८, शिंदखेडा तालुक्यातील ४४ हजार १३७ पैकी ३६ हजार ९७२ आणि साक्री तालुक्यातील ५५ हजार ८५२ खातेदार शेतकऱ्यांपैकी ३९ हजार २४३ शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ॲपवर पीकांची नोंदणी केली आहे. बहुतांश शेतकरी शेतात जाऊन 'ऑन द स्पॉट' पीक पाहणी मोहीम राबवित आहेत. यामुळे ई पीक पाहणीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात ४० हजार ११२ शेतकऱ्यांनी अजुनही ई पीक पेरा लावलेला नाही. अशा खातेदारांना इनॲक्टीव्ह रकान्यात टाकले आहे. साक्री तालुक्यात इनॲक्टीव्ह खातेदार शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक १६ हजार ६०३ इतकी आहे. तसेच धुळे तालुक्यातील १२ हजार २५८, शिंदखेडा तालुक्यात सात हजार १६५ आणि शिरपूर तालुक्यातील चार हजार ०८६ शेतकरी इनॲक्टीव आहेत. त्यांनी ई पीक पाहणी ॲपवर पीक पेरा नोंदवलेला नाही.