धुळे : रस्त्यावरील वाहनांना अडवून जबरी चोरी करणाऱ्या टोळीतील रमजान मेहबूब पठाण (वय २३, रा. ईब्राहीम मशिद, सरदार हॉलसमोर हाफीज सिद्धी नगर, वडजाई रोड, धुळे) या संशयिताला धुळ्यातून पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. ५ हजार रुपये रोख, १ हजारांचा मोबाइल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हा करण्यासाठी ज्याच्या गाडीचा वापर झाला त्याच्यासह चौघे फरार आहेत.
पोलीस त्यांच्या मागावर आहेत अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व पथक उपस्थित होते. धुळे तालुक्यातील हेकंळवाडी येथील समाधान ब्रिजलाल पाटील हे आपल्या एम.एच. ४६, बीबी ९६७० क्रमांकाच्या पिकअप व्हॅनने नवलनगर ते नंदाळे असा प्रवास करताना त्यांना आंबोडे गावाजवळील डोंगराजवळच एका कारमधून आलेल्या चौघा अज्ञात व्यक्तींनी अडविले. पाटील यांच्याकडे असलेली ४० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन व दहा हजार रुपयांची रोकड असा ऐवज बळजबरीने हिसकावून पोबारा केला होता. १८ मार्च रोजी भरदुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर धुळे तालुका पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. समांतर तपास सुरू असतानाच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार रमजान मेहबूब पठाण या तरुणाला संशयावरून ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केली असता त्याने कोणाला सोबत घेऊन जबरी चोरी केली त्याची माहिती दिली आणि गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून ५ हजार रुपये रोख, १ हजाराचा मोबाइल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय ज्याची कार घेऊन हा गुन्हा करण्यात आला त्यालाही याप्रकरणात पोलिसांनी आरोपी केलेले आहे. हे चौघे फरार असून पोलिस त्यांच्या मागावर आहेत.
पोलिस अधीक्षक संजय बारकुुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व त्यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक योगेश राऊत, सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय पाटील, कर्मचारी श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, योगेश चव्हाण, पंकज खैरमोडे, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, मयूर पाटील, अमोल जाधव, विनोद पाठक, जगदीश सूर्यवंशी, योगेश ठाकूर यांनी ही कारवाई केली.