धुळे : जिल्ह्यातील कांदा व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असून शासनाने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यांनी नुकतेच विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने कांदा, कापूस इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. यामुळे कांदा, कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्याची रोप लागवड, खर्च, खते, फवारणी व निंदणीचा खर्चही निघेनासा झाला आहे. कापसाच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. कापसाच्या कैऱ्या, बोंडे लालसर व काळी पडत आहेत. यामुळे माेठे नुकसान झाले आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर आपचे जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील, साेशल मीडियाप्रमुख पीयूष शिंदे, महारू पाटील, देवीदास माळी, महेश वाघ, अनिल पवार, सोमेश्चर खलाणे, भगवान कोळी, दत्तात्रय पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
कांदा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 4:39 AM