धुळे : तालुक्यातील फागणे येथील एका घरातून एटीएम कार्ड लंपास करीत दोघा अल्पवयीन मुलांनी मित्राच्या मदतीने परस्पर १ लाख ७१ हजाराची रक्कम लंपास केली़ त्यातून पिठाची गिरणीसह विविध वस्तूंची खरेदीही केली़ या गुन्ह्याची फिर्याद दाखल झाल्यानंतर तालुका पोलिसांच्या तपासणीतून २४ तासात या सर्व बाबी उघड झाल्या़धुळे तालुक्यातील फागणे येथील लोटन भिला बडगुजर (८०) हे राहत असलेल्या घराचा कडीकोंडा तोडून आतमध्ये प्रवेश करीत सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे एटीएम कार्ड आणि एटीएम कार्डचा पासवर्ड लिहिलेले पाकिट चोरुन घेतले होते़ त्यानंतर त्यांच्या खात्यातून १ लाख ७१ हजार ८९५ रुपये वापरले गेले़ त्यात काही रोख रक्कमही काढली गेली़ काही वस्तूही खरेदी करण्यात आल्या़ याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदविण्यात आला़तालुका पोलिसांचा तपास सुरु झाल्यानंतर दोन अल्पवयीन मुले पोलिसांच्या हाती लागले़ त्यांची सखोल चौकशी करीत असतानाच त्यांना पोलिसी खाक्या दाखविण्यात आला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली़ एटीएम कार्ड आणि त्याचा पासवर्ड चोरी केल्यावर त्यांचा मित्र संदिप रमेश धामणे (३५, रा़ लखमापूर ता़ सटाणा जि़ नाशिक) याच्याकडे दिले़ त्याने कार्डद्वारे १ लाख रुपयांची रोख रक्कम काढून घेतली़ कार्ड स्वॅप करुन ११ हजार रुपये किंमतीची घरगुती वापराची चक्की तसेच संदिप धामणे याचा शालक याला उसनवार ६० हजार रुपये दिले़ पोलिसांनी या चौघांची चौकशी केली असता ६० हजार रुपये पोलिस ठाण्यात हजर केले आहे़ तसेच या दोन अल्पवयीन मुलांकडून ३०-३० हजार रुपये किंमतीच्या दोन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या़ एकूण २ लाख २१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे़पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे व त्यांच्या पथकातील राजेंद्र मोरे, प्रविण पाटील, भूषण पाटील यांनी ही कामगिरी केली़
आॅनलाईन हौसमौज पडली महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 10:35 PM