धुळे,दि.21- जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीला केवळ 16.86 टक्के जलसाठा शिल्लक असल्याने आगामी काळात टंचाईच्या झळा तीव्र होणार आहे. जिल्ह्यातील 12 पैकी चार प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठी संपला आहे.
जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांत सद्यस्थितीला 62.87 दलघमी एवढाच उपयुक्त जलसाठा शिल्लक असून 16.86 एवढी त्याची टक्केवारी आहे. गतवर्षी याच कालावधीत शिल्लक असलेल्या जलसाठय़ापेक्षा तो अवघा एक टक्क्याने कमी आहे. गतवर्षी प्रकल्पांमध्ये 67.09 दलघमी (17.99 टक्के) एवढा साठा उरला होता. जिल्ह्यातील 12 मध्यम प्रकल्पांपैकी 8 प्रकल्पांमध्येच उपयुक्त साठा शिल्लक असून चार प्रकल्पांत त्याचे प्रमाण निरंक आहे. त्यामुळे पुढील महिन्यात पाणीटंचाईची झळ अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्यात लाटीपाडा (पांझरा), मालनगाव, जामखेडी, कनोली, बुराई, करवंद, अनेर, सोनवद, अमरावती, अक्कलपाडा, वाडीशेवाडी व सुलवाडे हे 12 मध्यम प्रकल्प आहेत. यापैकी सोनवद, अमरावती, अक्कलपाडा व वाडीशेवाडी या प्रकल्पांमधील उपयुक्त साठा संपला असून केवळ मृतसाठा शिल्लक आहे. अक्कलपाडा व वाडीशेवाडी प्रकल्पांमधून मार्च महिन्याच्या तिस:या आठवडय़ात पांझरा व बुराई नदीपात्रालगतच्या गावांमध्ये जाणवणा:या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आवर्तने सोडण्यात आली होती. पांझरा नदीलगतच्या शंभरावर तर बुराई नदीलगतच्या 20 पेक्षा जास्त गावांना त्या आवर्तनांमुळे टंचाईपासून दिलासा मिळाला आहे. परंतु मे महिन्यात आवर्तन सोडण्यासाठी या प्रकल्पांमध्ये उपयुक्त साठा शिल्लक नाही. मृतसाठय़ातूनच ती तजवीज करावी लागणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
साक्री तालुक्यातील लाटीपाडा व मालनगाव या प्रकल्पांमधूनही पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात आली आहेत. लाटीपाडातील आवर्तन थांबविण्यात आले असले तरी मालनगाव प्रकल्पातून विसर्ग सुरूच आहे.