आॅनलाइन लोकमतधुळे : शिक्षकीपेशाशी प्रामाणिक राहून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासोबतच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकास शिक्षकदिनी जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येत असते. २०२०-२१ या वर्षासाठी जिल्ह्यातील चारही तालुक्यातून केवळ आठ शिक्षकांचेच आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती शिक्षण विभागातून देण्यात आली.जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे दरवर्षी थोर शिक्षण तज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीदिनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºया शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येत असते. पुरस्कारासाठी शिक्षण विभागातर्फे जुलै महिन्यापासूनच इच्छूक शिक्षकांकडून प्रस्ताव मागविण्यास सुरवात केली होती.जिल्ह्यात साडेतीन हजार शिक्षकजिल्ह्यातील ११०३ जिल्हा परिषद शाळांमध्ये थोडथोडके नव्हे तर साडेतीन हजार शिक्षक कार्यरत आहेत. मात्र साडेतीन हजार शिक्षकांमधून केवळ आठ शिक्षकांनीच आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत.पूर्वी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षकांमध्येच प्रचंड स्पर्धा होती. एका तालुक्यातून अनेक प्रस्ताव दाखल होत होते. यातून आदर्श शिक्षक पुरस्काराची निवड करतांना समितीचीही कसोटी लागत होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून या पुरस्काराबाबत उदासिनताच दिसून येत आहे. दरम्यान आता या आठमधून कोणाला हा पुरस्कार मिळतो याची उत्सुकता लागून आहे.वेतनवाढ बंद केल्याचा परिणामपूर्वी आदर्श शिक्षकांना एक वेतनवाढ दिली जात होती. त्यामुळे तो मोठा आधार होता. मात्र २००८ पासून शासनाने आदर्श शिक्षकांना वेतनवाढ देणेच बंद केले, त्यामुळे अनेकांनी प्रस्ताव सादर करण्याकडेच पाठ फिरविली असल्याची चर्चा आहे.त्रयस्थांमार्फत मुल्यांकन व्हावेआदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षकाला स्वत:चा प्रस्ताव स्वत:च तयार करावा लागतो. हे काहींना पसंत पडत नाही. जिल्हा परिषदेला आदर्श शिक्षक पुरस्कार द्यायचा आहे, तर मग त्यांनीच त्रयस्थांमार्फत मुल्यांकन, पहाणी करून, आदर्श शिक्षकाची निवड केली पाहिजे असे काही शिक्षकांचे म्हणणे आहे. तसे होत नसल्यानेही काही शिक्षकांनी याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.
धुळे जिल्ह्यातून शिक्षक पुरस्कारासाठी फक्त आठ प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2020 12:51 PM