लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : राज्याचे रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या बुराई नदी परिक्रमेचे बुधवारी सकाळी १०.१५ वाजता साक्री तालुक्यातील दुसाणे येथे उदघाटन झाले. लवकरच पायी परिक्रमेस प्रारंभ होणार आहे. मंत्री रावल पाच दिवस पायी चालून बुराई परिक्रमा पूर्ण करणार आहेत. मंत्री रावल यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून दुसाणे-एक या बंधा-याचे व बुराई नदी परिक्रमेचे उदघाटन करण्यात आले. पाच दिवस ही नदी परिक्रमा सुरू राहणार असून त्या अंतर्गत मंत्री रावल नदीकाठावरील विविध गावांना भेटी देणार आहेत. त्यांच्या या परिक्रमेचा समारोप १५ एप्रिल रोजी तालुक्यातील अक्कडसे येथे होईल. त्याच दिवशी शहरातील गांधी चौकात त्यांची सभा होणार आहे. बुराई नदी परिक्रमा उदघाटन प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार, नरेंद्र गिरासे, भाजपच्या संजीवनी सिसोदे, चंद्रकला सिसोदे, धुळे विभाग प्रांत गणेश मिसाळ, शिरपूर विभाग प्रांत नितीन गावंडे, साक्री तहसीलदार संदीप भोसले, शिंदखेडा सुदाम महाजन, अपर तहसीलदार रोहिदास वारुडे, तालुका कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे, पोलीस अधीक्षक एम. रामकुमार, धुळे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, दुसाणे गावाच्या सरपंच जयश्री खैरनार, जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन नारायण पाटील, शिंदखेडा नगरपालिकेचे गटनेते अनिल वानखेडे यांच्यासह शिंदखेडा तालुक्यातील बुराई नदीकाठावरील गावांमधून आलेले ग्रामस्थ व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.