ऑनलाईन लोकमत
धुळे, दि.8 - मध्य प्रदेशातील मंदसौर येथून प्रारंभ झालेली अ.भा. किसान संघर्ष यात्रा 9 रोजी धुळे जिल्ह्यात येत असून शेतकरी संघटनेतर्फे चौकात विपश्यना साधना आंदोलन व निदर्शने करून या यात्रेस विरोध दर्शविण्यात आला.
शनिवारी शहरातील महात्मा गांधी पुतळा चौकात शेतकरी संघटनेचे माजी प्रांताध्यक्ष रवी देवांग यांच्या नेतृत्वात तासभर विपश्यना साधना केल्यानंतर त्यांच्या नेतृत्वात किसान संघर्ष यात्रा.गो बॅक.गो बॅक.अशा घोषणा देत निदर्शने करण्यात आली.
आज देशातील शेतकरी दु:खी, कर्जबाजारी आणि म्हणून लाचार आहे. आत्महत्या करण्याच्या स्थितीत आहे. शेतक:यांना देशातील इतर नागरिकांप्रमाणे सुखाने आणि सन्मानाने जगता यावे यासाठी शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी व्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या आधारे खुल्या व्यवस्थेची मागणी केली. परंतु दुर्दैवाने या विचाराविरूद्धच सध्या निघालेली किसान संघर्ष यात्रा प्रचार करीत आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याची मागणी हा त्यातीलच एक प्रकार आहे. त्या मुळे किसान संघर्ष यात्रेच्या नेत्या मेधा पाटकर, खासदार राजू शेट्टी, योगेंद्र यादव यांनी शेतक:यांना पारतंत्र्यात लोटू नये. असे नमूद करून या संदर्भात त्यांना सदबुद्धी होवो, म्हणून विपश्यना साधनेद्वारे प्रार्थना आंदोलन करत असल्याचे शेतकरी संघटनेतर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
किसान संघर्ष यात्रा गो बॅक.
विपश्यना साधनेनंतर किसान संघर्ष यात्रा.गो बॅक.गो बॅक.अशा घोषणा देत परिसरात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी रवि देवांग, गुलाबसिंग रघुवंशी, आत्माराम पाटील, शांतू पटेल, भिला पाटील, नारायण पाटील, धनराज पाटील, मनोहर पाटील, सुनील वाघ, रामदास जगताप, देवेंद्र पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.