विजय माळी ।न्याहळोद : एकवेळ हंडाभर पिण्याचे पाणी मिळू शकेल पण फळबाग कशी वाचवायची ही चिंता शेतकऱ्यांना पडली आहे. गतवर्षी लागवड केलेली फळबाग पाण्याअभावी जळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. उत्पन्न तर दूर पण आजपर्यंत केलेल्या खर्चाचे कर्ज डोक्यावर बसले आहे.पाऊस समाधानकारक होईल, असा अंदाज गतवर्षी हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार शेतकºयांनी फळबागेचे नियोजन केले. मात्र अत्यल्प पाऊस झाल्याने विहिरींना पाणी आलेच नाही. आतापर्यंत इतर पिकांची लागवड न करता वर्षभर ह्या बागा जगविल्या. त्यांना बहार देखील आला पण पाण्याअभावी फळांची वाढ झाली नाही. बाजारात माल जाण्याआधी अनेक शेतकºयांच्या फळबागा पाण्याअभावी जळल्या आहेत. फळबाग लागवड पावसाळ्यापूर्वीच करावी लागते. पावसाळा चांगला होईल, या आशेने शेतकरी लाखो रुपये खर्च करून फळबाग लावतो. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन करून झाडे जगवली; परंतु हवामान खात्याच्या अंदाज नुसार पाऊस न झाल्याने शेतकºयांच्या पदरी काहीच पडलेले नाही. इतर पिके कमी कालावधीची असतात. उपलब्ध पाण्यानुसार त्यांची लागवड केली जाते. परंतु फळबाग नियोजन पावसाळ्यापूर्वीच करावे लागत असल्याने ‘पाऊस पडला तर ठीक नाही तर नुकसान’ असे समीकरण असते. सलग तीन वर्षे पाऊस झालेला नाही. कृषिखाते फळबाग लागवडीस प्रोत्साहन देते तर शासन जलसंधारणाकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे बाजारात फळे कशी नेणार, हा प्रश्न शेतकºयांसमोर आहे.
उत्पन्नाआधीच जळाल्या फळबागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2019 7:14 PM