आॅनलाइन लोकमतधुळे : ग्रामीण भागात सेवा करणारे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता मिळण्यासाठी मुख्यालयी राहत असल्याचा ग्रामसभेचा ठराव घेण्या संदर्भात ग्रामविकास विभागाने नुकताच आदेश काढला आहे. हा आदेश रद्द करावा अशी मागणी जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, घरभाडे भत्ता हा वेतनाचा एक भाग आहे. शिक्षकांची सेवा अध्यापनाशी निगडीत असून, त्यावेळेव्यतिरिक्त शिक्षकांची गावात गरज पडेल अशी कोणतीही स्थिती नसते. आपत्तीच्याप्रसंगी शिक्षक कुठल्याही आदेशाची वाट न पाहता गावात उपस्थित राहून आपले कर्तव्य पार पाडत असतात.शासनाने शिक्षकांबाबत आदेश काढतांना शिक्षकाच्या व त्याच्या कुटुंबाच्या निवासाची काही व्यवस्था केली का याचा कोणताही विचार केलेला नाही. गावात राहण्याने कोणता फायदा होतो हे अनाकलनीय आहे. उलट गावातील राजकीय कलहामुळे नवीन पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामविकास विभागाने काढलेल्या आदेशाचा संघटना निषेध करीत आहे. हा आदेश मागे न घेतल्यास महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक समिती आंदोलन करेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. निवेदन देतेवेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस बापू पारधी, मनोज निकम, एकनाथ भामरे, कैलास दाभाडे, सुरेश पाटील, आनंद पाटील, रमेश पाटील, प्रभाकर रायते, अनिल नहिरे, सुभाष पगारे आदी उपस्थित होते.
कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्यासंदर्भातील आदेश रद्द करण्यात यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 8:29 PM