लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : आम्ही लोकसंग्राम पक्षाला गृहीत धरत नाही़ त्यामुळे आमची लढाई काँग्रेस-राष्ट्रवादीशी असून आमदार उगाच आदळआपट करीत असल्याची टीका केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी केली़ शहरात शुक्रवारी लोकसंग्रामच्या गुंडांनी जो धुमाकूळ घातला तो जनतेने पाहिला़ पारोळयाचे माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांच्या गाडीचा क्रमांक एमएच १९ होता म्हणून फोडण्यात आली़ शिवाय त्यांना साधी तक्रारही देता आली नाही, हे दुर्देव आहे़ काही कारण नसतांना गाडी फोडल्याने आमदारांनी कार्यकर्त्यांना सुनावायला हवे होते तर त्यांनी पोलीस ठाण्यात धुडगूस घातला़ अखेर पोलीसांना माघार घ्यावी लागली, ही लोकशाही की दडपशाही? असे डॉ़ भामरे म्हणाले़ त्याचप्रमाणे भाजप प्रांतिक कार्यालयातून १७ जणांची टिम धुळयात जनजागृतीसाठी आली होती, त्यांनाही लोकसंग्रामचे उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोंडून देत हुज्जत घातली़ प्रभाग एकमध्ये भाजप कार्यकर्ते रात्री घरी जात असतांना लोकसंग्रामच्या गुंडांनी त्यांना मारहाण केली़ गुंडगिरी करून जनतेत दहशत निर्माण करण्याचे काम लोकसंग्रामकडून सुरू असून शहरात गुंडगिरी चालू देणार नाही, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी आधीच दिला आहे, असे डॉ़ भामरे म्हणाले़ शहरातील गुंडगिरी थोपविण्यासाठी गृहखाते सक्षम आहे़ भाजपकडून मतदारांना पैसे वाटप होत असल्याच्या आरोपात तथ्य नाही़ मतदानानंतर हा मुद्दा गांभीर्याने घेणार आहोत़ भाजप प्रत्येक निवडणूक गांभीर्याने घेतो, म्हणून आमचे नेते प्रचाराला येतात़ तुमच्याकडे नेतेच नाही, तर तुम्ही आणणार कुठून? असा प्रश्न संरक्षण राज्यमंत्री डॉ़ भामरे यांनी उपस्थित केला़ शिवाय शहरात गुंड कोण, हे आता जनतेनेच ठरवावे, असेही ते म्हणाले़
आमची लढाई गोटेंशी नाहीच, त्यांची उगाच आदळआपट सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 9:56 PM