धुळे,दि.10-खान्देश कुलस्वामीनी श्री एकविरा देवी यात्रोत्सवास थाटात प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होत आहे. सोमवारी दिवसभरात 900 चिमुकल्या मुलांचे जाऊळ काढण्यात आले. तसेच कुळधर्म, कुराचारासाठी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी झाली होती.
सालबादप्रमाणे यंदाही एकविरा देवीचा यात्रोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जात आहे. यावर्षी चौदसच्या दोन तिथी आल्यामुळे काही भाविकांनी रविवारी त्यांच्या मुलांचे जाऊळ काढले; तर आज चौदसचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे खान्देशातून अनेक भाविक त्यांच्या मुलांचे जाऊळ काढण्यासाठी मंदिर परिसरात सकाळापासूनच दाखल झाले होते. जाऊळ काढण्यासाठी मुलांची एकच गर्दी झाल्यामुळे मंदिर परिसरात नाभिकांची बरीच शोधशोध करावी लागली.
आज पालखी मिरवणूक
श्री एकविरा देवी भगवतीची पालखी व शोभायात्रा मंगळवारी, 11 रोजी दुपारी चार वाजता काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेची सुरुवात मंदिरापासूनच होणार आहे. तत्पूर्वी मंदिर संस्थानचे मुख्य ट्रस्टी सोमनाथ गुरव यांच्या हस्ते महाअभिषेक व पाद्यपूजेचा कार्यक्रम होणार आहे.
दहा दिवस चालणार यात्रोत्सव
कुलस्वामीनी एकविरा देवीचा यात्रोत्सव दहा दिवस चालणार असल्याची माहिती एकविरा देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे.
नैवेद्यासाठी भाविकांनी मांडल्या चुली
चैत्रोत्सवात अनेक भाविकांच्या घरी कुळधर्म, कुलाचाराचा कार्यक्रम असतो. चैत्रोत्सवाचे औचित्य साधत हा कार्यक्रम कुलस्वामीनीच्या मंदिरात करण्याकडे काही भाविकांचा कल असतो. त्यामुळे मंदिरातील मुख्य प्रवेशद्वारासमोर अनेक भाविकांनी चुली मांडल्या होत्या. त्यात कुलस्वामीनीला नैवेद्य दाखविण्यासाठी पुरणपोळी, मांडे, खीर, कणकीचे दिवे, भात, वरण हे चुलीवरच शिजवल्याचे दिसून आले.