चाळीसगाव : कोरोना म्हटलं की, उपचार सोडून घाबरून पळणारे काही कमी नाहीत. पण त्या चिमुकलीचं दु:ख याहीपलिकडं आहे. खरंतर तिच्या या कोवळ्या वयातच तिने स्वत:ला सिध्द केलंय की या साऱ्या परिस्थितीशी झगडण्यासाठी.. त्या चिमुकलीची ही कहाणी अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारी नक्कीच आहे.
आठवड्यापूर्वी एक परी रुग्णवाहिकेत शेवटच्या घटका मोजत असल्याची वार्ता पसरली. तिचे कुटुंब तिच्यासाठी व्हेंटिलेटर, ऑक्सिजन नसलं तरी फक्त आमच्या समाधानासाठी बेड द्या, अशी विनंती करत होते. चाळीसगाव विकास मंचकडे हा विषय आला. परी आधीच लिव्हरच्या कर्करोगाने ग्रस्त आहे. त्यात करोना अशा परिस्थितीत बेड मिळणं कठीणच होत. आम्ही बेडसाठी अनेक ठिकाणी प्रयत्न केला पण सर्वत्र नकार मिळाला, असे या कुटुंबियांनी सांगितले. अखेर पाचोरा उपजिल्हा रुग्णालयात डॉ. अमित साळुंखे यांनी एक स्टोअररूम स्वच्छ करून परीला दाखल करून घेतलं.
आठवड्यात डॉ. अमित आणि त्याच्या टीमने अथक प्रयत्न करून परीवर उपचार सुरु केले. त्या चिमुरडीला माहितही नव्हतं ती कोणत्या मोठ्या आजाराचा सामना करत आहे. तिचं निष्पाप मन यापासून अनभिज्ञ होतं. तिच्यावर डाॅक्टरांनी उपचार केले. विशेष म्हणजे परीला कुठलाही रेमडिसिव्हर दिल नाही किंवा तिला व्हेंटिलेटरवरदेखील ठेवलं नाही. एक मदत म्हणून ऑक्सिजन लावण्यात आला होता. शासनाने ठरवून दिलेल्या निकष प्रमाणे तिच्यावर उपचार झाले. आज परी पूर्णपणे बरी झाली असून परीला तिच्या कुटुंबाकडे सोपवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे परीची आई आणि आजोबाही कोरोनाबाधित आहेत. त्यांनाही चाळीसगाव विकास मंच मदत करत आहे.
इच्छाशक्तीला सलामn परी कोरोनातून बरी होउन आता घरी परतली, तिनं एवढ्या छोट्या वयात कोरोनाला हरवून एक मोठा आदर्श घालून दिला आहे की घाबरू नका, लढा अन यशस्वी व्हा.. परीची परिक्षा इथंच संपत नाही, कारण तिचा लढा आता लिव्हरच्या कॅन्सरशी सुरु झाला आहे.