लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : येथील लोकमान्य या खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचे व परिवारातील सदस्यांचे अव्वाच्या सव्वा बिल आकारण्यात आल्याचे समोर आले आहे. ज्यादा बिल आकारणाऱ्या रुग्णालयाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी गणेश कानडे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जिल्हाधिकारी व आयुक्तांना त्यांनी याबाबत निवेदन दिले आहे.कोरोनाची बाधा झाल्यामुळे गणेश यांच्या आई शोभाबाई कानडे ८ आॅगस्ट ते २१ आॅगस्ट पर्यंत शहरातील लोकमान्य रुग्णालयात उपचार घेत होत्या. रुग्णालय जास्त पैसे आकारत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण जेठेवाड यांच्याकडे तक्रार केली होती. २० आॅगस्ट रोजी शोभाबाई याना डिस्चार्ज मिळणार होता. मात्र आणखी पैसे भरण्यासाठी रुग्णालयाने तगादा लावला.रुग्णालयाने एकूण ४ लाख ५२ हजार रुपये बिल आकारल्याचे गणेश कानडे यांचे म्हणणे आहे. अधिकचे पैसे भरले नाहीत म्हणून उपचार पूर्ण झाल्यानंतरही रुग्णालयातून डिस्चार्ज मिळत नव्हता. यामुळे प्रवीण जेठेवाड यांनी जिल्हाधिकारी व आयुक्तांकडे तक्रार केली. त्यानंतर सहायक आयुक्त विनायक कोते यांनी २१ आॅगस्ट रोजी रात्री ९ वाजता रुग्णालयाला भेट देऊन रुग्णाला डिस्चार्ज मिळवून दिला. दरम्यान एकूण बिलापैकी, कानडे परिवाराने २ लाख १७ हजार रुपये भरले आहेत. मात्र पावती मिळाली नसल्याचे कानडे यांचे म्हणणे आहे.प्राथमिक चौकशीत आढळले तथ्य सहाय्यक आयुक्त विनायक कोते यांनी रुग्णालयाला भेट देऊन चौकशी केली. प्राथमिक चौकशीत रुग्णालयाने ज्यादा बिल आकारल्याचे आढळले असल्याचे त्यांनी सांगितले. 'कोविड मेन्टेनन्स दर' या नावाने काही हजार रुपयांचे बिल आकारले जात आहे.अशाप्रकारचा कोणताही चार्जे रुग्णांसाठी लागत नसल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच किती रुग्ण दाखल आहेत व किती खाटा शिल्लक आहेत याचा तपशील असलेला फलक रुग्णालयात लावण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.
जादा बिल आकारल्याचा रूग्णाचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 8:59 PM