लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरात गेल्या पाच वर्षात कर्तव्यदक्ष चार आयुक्त, चार पोलीस अधिकाºयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. हे सर्व प्रकार शहरातील घाणेरड्या राजकीय व्यवस्थेमुळे घडले असून आपल्या शहराचे आमदारही बेजाबदार आहेत. त्यामुळे प्रशासनाने त्यांना न घाबरता शासनाकडे त्यांच्या विरोधात आपली भूमिका मांडावी, असे आक्रमक प्रतिपादन माजी नगराध्यक्ष महेश मिस्तरी यांनी येथे केले. गणेशोत्सव व बकरी ईदच्या निमित्ताने सोमवारी दुपारी नियोजन सभागृहात आयोजित शांतता कमिटीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, जि.प.चे. मुख्यकार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन, जि.प. अध्यक्ष शिवाजी दहिते, महापौर कल्पना महाले, गजानन पाठक, मौलाना शकील, माजी आमदार शरद पाटील, डॉ. संजय पाटील, प्रदीप कर्पे, सत्तार शहा, मीना बैसाणे, वाल्मीक दामोदर, रमेश श्रीखंडे, संजय पगारे आदी उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. महेश मिस्तरी म्हणाले, की चांगल्या अधिकाºयांना शहरात टिकू दिले जात नाही. गोर, गरीबांचे ओटे, अतिक्रमण काढण्याचा घाट शहरात घातला जातोय. आता तर शहराच्या आमदारांनी कालिका मंदिर व त्या परिसरात असलेले पंचमुखी हनुमान मंदिर पाडण्यासाठीचे पत्र शासनाला दिले आहे. आमदाराच्या या कृतिमुळे जनता नाराज आहे. त्यांच्या मनात खदखद आहे. आमदारांच्या विरोधात पत्रकारांनी भूमिका मांडली तर त्यांच्यावरही दडपशाडी केली जात असून काही पत्रकारांवर तर ते मोक्का लावण्याचे पत्र देतात. त्यामुळे प्रशासनाने त्यांच्या विरोधात शासनाकडे भूमिका मांडावी, असे त्यांनी आक्रमकपणे सांगितले.
गणेशोत्सवानंतर उपोषण करणार दलित ज्येष्ठ नेते एम. जी. धिवरे म्हणाले, की महापालिकेच्या बाजूला असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्र पाडण्यापूर्वी शासनाने चर्चा करून हा विषय मार्गी लावावा, असे मनपा प्रशासनाला सूचित केले होते. परंतु, तसे न करता, कोणालाही विश्वासात न घेता हे अध्ययन केंद्र पाडण्यात आले आहे, याचा पाठीमागे कोण आहे? याची चांगलीच कल्पना असून आता गणेशोत्सव झाल्यानंतर याप्रश्नी उपोषण करणार असल्याचे त्यांनी येथे सांगितले. अध्ययन केंद्र पाडल्यामुळे दलित जनतेमध्ये खदखद पसरली असून त्याचा स्फोट केव्हाही होऊ शकतो, असेही ते म्हणाले.