लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : पारोळारोडवरील साध्वी प्रीती सुधाजी इंग्रजी स्कूलने नियमांचे उल्लंघन करून अनधिकृतपणे १० वृक्ष तोडल्याचा प्रकार आढळून आला होता. याप्रकरणी या स्कूलवर प्रती झाडे तीन हजार रुपये दंड व जेवढी वृक्षे तोडली तेवढीच स्कूल परिसरात लावण्याचा निर्णय शुक्रवारी वृक्ष प्राधिकरण समितीच्या सभेत उपस्थित सदस्यांनी सर्वानमुते घेतला. मनपा आयुक्तांच्या दालनाच्या बाजूला असलेल्या सभागृहात शुक्रवारी सकाळी ही सभा झाली. यावेळी आयुक्त सुधाकर देशमुख, उपायुक्त आयुक्त रवींद्र जाधव, सहाय्यक आयुक्त शांताराम गोसावी, उपमहापौर उमेर अन्सारी, सदस्य मनोज मोरे, जगदीश गायकवाड, नलिनी वाडिले, ललिता आघाव, इस्माईल पठाण प्रशांत श्रीखंडे उपस्थित होते. फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला मागे!साध्वी प्रीती सुधाजी इंग्रजी स्कूलने केलेल्या अर्जानुसार १८ जुलै २०१७ रोजी झालेल्या वृक्षप्राधिकरणाच्या सभेत ११ नग बुचाचे झाड व तीन नग अमलतासच्या झाडांचा विस्तार कमी करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र, २३ आॅगस्टला मनपाच्या कर्मचाºयांनी तेथे पाहणी केली असता या स्कूलने प्रत्यक्ष १० नग झाडे पूर्णपणे तोडून टाकल्याचे चित्र दिसून आले होते. त्यामुळे सभेच्या अजेंड्यावर या विषयाचे वाचन सुरू असताना मनपा आयुक्त देशमुख यांनी संबंधित स्कूलवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे आदेश दिले. परंतु, उपस्थित सदस्य मनोज मोरे व जगदीश गायकवाड यांनी या निर्णयावर आक्षेप घेत दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर आयुक्तांनी संबंधित स्कूलचा नेमका झाडांचा विस्तार कमी करण्यासाठी अर्ज केला होता का? की वृक्षतोडीसंदर्भात अर्ज केला होता याविषयी कर्मचाºयांना विचारणा केली. यावेळी सदस्य मनोज मोरे यांनी १९ मेचे संबंधित शाळेचे पत्र आयुक्तांदा दाखविले. या पत्रावर संबंधित स्कूलने वृक्षतोडी संदर्भातच अर्ज केला होता, असे मोरे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावरून संबंधित शाळेवर सभेच्या सुरुवातीला झालेला फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय मागे घेण्यात येऊन दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मनपाच्या अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज शहरात बेकायदा होणारी वृक्षतोड थांबविण्यासाठी मनपाने त्यांचे कर्मचारी किंवा त्रिस्तरीय समिती सदस्यांवर अवलंबून न राहता स्वत: पाहणी केली पाहिजे, अशी मागणी सदस्य मनोज मोरे यांनी केली. तर प्रशांत श्रीखंडे यांनी राजवाडे संशोधन मंडळातही बेकायदा वृक्ष तोड झाल्याचे प्रकार सभेत निदर्शनास आणून दिले. त्यानंतर आयुक्त देशमुख यांनी यासंदर्भात तातडीने पाहणी करून तसा अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. शहरात वृक्ष लागवडीसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
आयुक्त-मोरे यांच्यात शाब्दीक चकमकसाध्वी प्रीती इंग्रजी स्कूलने केलेल्या वृक्षतोडी प्रकरणाच्या निर्णयावर मनपा आयुक्त देशमुख व मनोज मोरे यांच्यात सभागृहात शाब्दीक चकमक झाली. मनपा आयुक्त सदस्यांची बाजू ऐकून घेत नाही. त्यांना बोलू देत नाही, म्हणून सदस्य मोरे यांनी चक्क सभात्याग करण्याचा इशारा दिला. परंतु, त्यानंतर आयुक्तांनी संबंधित स्कूलवर कारवाई करण्यासाठी फौजदारी गुन्हा दाखल करावा किंवा दंडात्मक कारवाई करावी, असा पर्याय सभेला उपस्थित सदस्यांपुढे ठेवला. त्यावर उपस्थित सदस्यांनी संबंधित स्कूलवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सभागृहातील वातावरण शांत झाले. ३० हजार रुपयांचा दंड
साध्वी प्रीती सुधाजी इंग्रजी स्कूलतर्फे अमलतास २, १ औदुंबर व ७ बुचाची झाडे असे एकूण १० झाडे तोडल्यामुळे एकूण ३० हजार रुपयांचा दंड या स्कूलला ठोठावला आहे. सभेत या स्कूलने दिलेल्या खुलाश्याचेही वाचन झाले. त्या खुलाश्यात स्कूलने की मनपाकडे वृक्षतोडी संदर्भात तक्रारी केल्या होत्या. परंतु, लक्ष दिले जात नव्हते. स्कूलमधील सर्व वृक्ष ही धोकादायक झाली होती. तर काही वृक्षांमधून किटक व अळ्या स्कूल परिसरातील नागरिकांच्या अंगावर पडत असल्यामुळे त्यांना त्वचेचे आजार होत होते. काही दिवसांपूर्वीच शाळेच्या परिसरात एक डेरेदार वृक्ष पडले होते. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली होती. भविष्यात असे प्रकार होऊ नये, म्हणून वृक्षतोड केली.